क्रीडा व मनोरंजन

25 मिनिट….अन आयुष्याची चित्तरकथा मांडणारा अस्लमभाईचा “तासिका”…..! ✍️  सुभाष सुतार. ✍️

चित्रपट“, हे प्रबोधन, मनोरंजन आणि समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. समकालीन चित्रपटांनी समाजाला परिवर्तनशील व्हायला भाग पाडले आहे. या अर्थाने, चित्रपट प्रेक्षकांना

विचारमंथना कडे घेऊन जातो. असाच एक लघुपट येतोय….वास्तव अधोरेखित करणारा… थेट बोट ठेवणारा…कटू सत्य सांगणारा….! खर म्हणजे या लघुपटाच्या माध्यमातून “ती” चित्तरकथाच आहे. लघुपटात निमित्तमात्र “प्राध्यापक” दिसतो पण त्या जागी अन्य पात्र ही दिसू शकतील. कदाचित तुम्ही – आम्ही ही असू त्यात…! प्रत्येक प्रेक्षकाला भावेल अशी संवेदनशील “स्टोरी” तासिका ने समोर आणली
आहे. ती लिहून काढलीय, अस्लम भाई नावाच्या उच्च विद्याविभूषित
भूमिपुत्राने…!
खर म्हणजे तेच या लघुपटाचे सर्वेसर्वा आहेत. महाविद्यालयात तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या ‘सीएचबी’ प्राध्यापकांचे प्रश्न, त्यांची हतबलता, ससेहोलपट, वेदना मांडणारा ‘तासिका’ लघुपटाचे ट्रेलर सध्या चर्चेत आहे. तासिका….(सीएचबी) तत्त्वावर कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयात पात्र “विद्यार्थी” वर्षानुवर्षे काम करत आहेत. भावी आशेवर तात्पुरते प्राध्यापक झालेल्या , त्या “प्राध्यापकांची” ही कथा आहे. मात्र, ताका पुरती आजी, या दृष्टिकोनातून त्यांचा छळ केला जातोय. हे वास्तव चपखल पणे लघुपटात दाखवले आहे. बी.एड , एम.एड. नेट,सेट, पीएच.डी असूनही नोकरी नाही. भावी अध्यापकांचा कोंडमारा होतोय. तासिका संपल्यानतर प्राध्यपंकाना दिवसभर वेगवेगळ्या कामांसाठी राबवून घेतले जाते. तुटपुंजे वेतनही वेळेवर मिळत नाही. ही घुसमट निमूटपणे सहन करून नोकरी करावी लागते. तीन प्राध्यापक या लघुपटातल्या कथानकाचे नायक आहेत. तासिका तत्वावर काम करून, संसार करू पाहणाऱ्यांचे कसे हाल होतात. त्यावर उपाय म्हणून इतर कामे करण्याची वेळ येते. आपल्याकडे एक ग्रामीण भागातील म्हण आहे. आशेला लावलं अन ……!
या अर्थाने या सर्व प्राध्यापकाची कथा सुद्धा याच म्हणी सारखी झाली आहे. त्यातले एक-दोन प्रसंग….सकाळी सकाळीच तोंड धुत बसलेला एक युवक, प्राध्यापकला उसने शंभर रूपये मागतो तेव्हा सरांचा चेहरा पाहण्या सारखा…!
मेसवाली मालकीण….अहो सर, कधी देणार पैसे अन कधी वाढणार तुमचा पगार. तुम्हाला प्राध्यापक तरी कस म्हणाव…देवच जाणो बाबा..! हाॅटेलवरचा किस्सा ही व्यवस्थेचे लक्तर वेशीवर टांगणाराच आहे. छान चित्रित केलाय हा प्रसंग. अंगावर काटाच उभा राहतो तसा राग ही येतो.
वेटर मालकाला म्हणतो, मालक माझा पगार नऊ हजार…! अन सरांना किती असेल बर…पगार…!
मालक म्हणतो, असल की पाच सात हजार रु…! बाबो, बर झाल मग म्या नाय शिकलो…? या मागचा उद्देश प्रेक्षक समजून घेईल.
असाच एक जोक वाचण्यात आला होता. विद्यापीठात शिकून सवरून पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा सनद हवी असते तेव्हा ती “पुंगळी” करून देतात. विद्यापीठ, डिगरीला (सनद) पुंगळी करून का देते, हे आता लक्षात येऊ लागलय. विनोद म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले तरी आजचे वास्तव काय आहे…..! अस्लम भाईनी नेमके त्यावर बोट दाखवून समाजाने उभ्या केलेल्या सरकार नावाच्या
व्यवस्थेला प्रश्न विचारलाय. अस्लम भाईना उत्तर हवय, लघुपट बाहेर येईल तेव्हा व्यवस्थेला उत्तर द्यावेच लागेल….! अस्लम भाई या लघुपटाचे दिग्दर्शक, निर्माता आहेत. त्यांची
अलिकडेच ओळख झाली. गेवराई जि.बीड (मराठवाडा)चे भूमिपुत्र आहेत. खूप कष्टाळू आहेत. नाट्य कलावंत आहेत. तब्बल पाच वेळा नेट
झालेत. पीएच.डी सुरू आहे.
प्रज्ञावंत विद्यार्थी म्हणून फेलोशिप मिळाली आहे. ते ही सीएचबी वर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काही काळ कार्यरत होते. खूप मेहनत करून आणि त्यांनी पोटाला चिमटा घेऊन 25 मि.चा लघुपट बनवला आहे. आग्रह करून त्यांनी हा लघुपट दाखवला. त्यातले डावे उजवे न करता या लघुपटाला दादा द्यावी लागेल. या लघुपटात रूपेश परतवाघ, जगदिश जाधव, संदीप पाटील, गजेंद्र घायवट पृथ्वी काळे, ऐश्वर्या कुलकर्णी, अनिलकुमार बस्ते, पद्मनाभ पाठक , प्रियंका गंगावणे , जगदीश कोथळे यांच्या भूमिका आहेत. या लघुचित्रपटाची निर्मिती बागवान प्रोडक्शनच्या सलमान शेख यांनी केली असून, छायाचित्रण अनिल बडे यांनी केले आहे. संकलन महेश हरबक, अनिल बडे, संगीत पंकज मोरे ,कला दिग्दर्शन रामेश्वर देवरे,पंकज लोखंडे, प्रोडक्शन मॅनजमेंट रावबा गजमल,अभिमान उनवणे, रंगभूषा जॉय भांबळ,गायत्री तरतरे ,सहाय्यक दिग्दर्शन राजेश आगुंडे, बाळू बटुळे यांच आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात या लघुपटाचे चित्रीकरण झाले आहे. सगळ्या कलाकारांनी छान भूमिका केल्यात. राजकीय नेता मस्त रंगवलाय. काळजाला हात घालणारे काही संवाद आहेत. सगळेच येथे सांगणे योग्य ठरणार नाही. पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, भागवत जाधव, जुनेद बागवान आणि मी हा लघुपट पाहिला आहे. आम्हाला हा लघुपट आवडला आहे. जेव्हा तो येईल तेव्हा या मराठी तरूणाचा “तासिका” बघायला विसरू नका, एवढीच माफक अपेक्षा आहे. आपल्या माणसाचे आपण कौतुक केले म्हणजे दुधात साखर , नाही का !

                        ✍️  सुभाष सुतार. ✍️
(पत्रकार)

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close