राजकीय

राज्यसभा पोटनिवडणूक: रजनीताई पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी

मुंबई — काँग्रेसचे नेते खा. राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेवर होणार्‍या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश आणि तामिळनाडूमधून राज्यसभेच्या रिक्त झालेल्या एकूण सहा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रभारी रजनी पाटील यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केले. रजनी पाटील या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी असून, महाविकास आघाडीकडून राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्यांसाठी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.
भाजपाकडून संजय उपाध्याय
सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. संजय उपाध्याय यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
थोरातांना आठवली प्रथा, परंपरा
या पोटनिवडणूकीसाठी उमेदवार दिल्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाला प्रथा आणि परंपरेची आठवण करून दिली. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता, असे थोरात यांनी सांगून, या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देवू नये, यासाठी विनंती करणार असल्याचे सांगितले.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close