क्राईम

वमने साहेब …! एवढं असतं का उताणं,गाडगं भरलं मूतानं;राशन धान्य चोरांना कुठपर्यंत पाठीशी घालणार ?

बीड — पाच हजार राशन कार्ड चा काळाबाजार, जुलैचा विकतचा राशन चा माल सर्वच दुकानदारांनी गायब केला. गोरगरिबांचा तोंडातला घास हिरावला जात आहे. वाळू व गौण खनिजांची राजरोस चोरी सूरू आहे. या सारख्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार पद आहे ‌पण वमने साहेब खुर्ची शी बेईमानी करत तुम्ही उताना कारभार सुरू केलाय त्याचीच परिणीती म्हणून आज तांदळवाडी ग्रामस्थांनी काळ्या बाजारात जाणारा राशन चा 54 पोते माल पिक अप सह पकडला. आरोपींना मालासह नेकनुर पोलिसांच्या हवाली केले. जनतेनं जागरूक नागरिकाचं कर्तव्य केलं आणि तुम्ही राशन दुकानदारांच्या खाल्लेल्या मिठाला जागत कर्तव्याशी गद्दारी करत गुन्हा नोंद करण्यात टाळाटाळ केलीत. या सर्व प्रकारामुळे तुमच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह जनतेकडून निर्माण केले जात आहे.

वमने साहेब सुरुवातीला बीड तहसील ला तरुण तडफदार तहसीलदार मिळाला म्हणून लोकांच्या आशा-आकांक्षा उंचावल्या गेल्या होत्या. पण दुर्दैवाचा फेरा असा की जनतेच्या कामांचा बोजवारा तुमच्या कार्यकाळात उडत गेला. अधिकार पदाचा वापर करत स्वतःची तुंबडी भरणा-या पुरताच तो मर्यादित राहिला. त्यामुळेच वाळू माफिया राजरोस आपले धंदे सुरू ठेवू शकले. अवैध उत्खनन गौण खनिजांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली गेली. तहसीलदार पद फक्त नावालाच आहे की काय असा प्रश्न जनतेला पडू लागला. यातून वैयक्तिक मिळणारा महसूल कमी पडू लागला म्हणून गोरगरिबांच्या ताटातील अन्न हिरावून घेण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्याकडून राजरोस सुरू आहे. जुलै महिन्याचा धान्याचा कोटा सर्व राशन दुकानदारांनी बँड बाजा लावत काळ्याबाजारात विकला जनतेने ओरडही केली पण राशन दुकानदारांनी दिलेल्या पैशाच्या खणखणाटापूढे जनतेच्या ओरडण्याचा आवाज तुमच्या कानावर आलाच नाही. सध्या तहसील चा कारभार म्हणजे उतानं राज्य असल्याचं जनतेतून उघड बोललं जात आहे. आता हेच पहा ना तुमच्या कर्तव्यदक्षतेचा इरसाल नमुना जनतेला दिसून आला. चोराला मेसाई धार्जिन अशी एक म्हण प्रचलित आहे तिचा प्रत्यय अनुभवायला मिळाला तांदळवाडी च्या सुजाण नागरिकांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास काळ्याबाजारात जाणाऱ्या राशनच्या गहू तांदूळाचा पिक अप क्र.एम.एच.12 एल.टी.4653 रंगेहात पकडला. यामध्ये राशनच्या धान्याचे चोपन्न पोते आढळून आले. ग्रामस्थांनी तात्काळ या घटनेची वर्दी नेकनूर पोलिसांना दिली. नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी जात धान्य असलेले पिक अप ताब्यात घेतले. आरोपींना देखील पोलिसांच्या स्वाधीन केले.या प्रकरणी कारवाई करत असल्याचं नाटक करत नायब तहसीलदार संजय राऊत यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांना सोबत घेऊन जात पंचनामा केल्याचं नाटक केलं. धान्य ताब्यात घेऊन पोलिस पाटलाच्या हवाली केला. बीडला आल्यानंतर पंचनाम्याची प्रत तहसिलदारांना दिलीच नाही. तहसीलदारांना देखील या प्रकरणात साधी चौकशी करावी काय कारवाई केली हे पहावं याची आवश्यकता वाटली नाही. शेवटी खाल्लेल्या मिठाला जागत आज नेकनूर पोलिसांना पंचनाम्याची प्रत व तक्रार न केल्यामुळे गुन्हा दाखल करता आला नाही. पोलिसांची परिस्थिती अडकीत्यात सापडलेल्या सुपारी सारखी झाली. आरोपींना अटक न करता त्यांचा पाहुणचार करत बसायची वेळ आली. तांदळवाडी सध्या खडकीच्या रेशन दुकानाला जोडण्याचं काम तहसीलदारांनी केलं होतं. भोसले नावाच्या या राशन दुकानदाराला कितीही वादग्रस्त असला तरी वमनेंचा आशिष मिळत गेला. वमने साहेब तुम्ही मोठ्या पदावर आहात अधिकाराचा गैरवापर करून तुम्ही संपत्ती मोठी कमवाल पण गोरगरिबांचा तळतळाट तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना भोगावा लागणार हे विसरू नका. अजुनही वेळ गेली नाही तुम्ही सरकारी कर्मचारी आहात जनतेचे नोकर आहात. राशन दुकानदारांचे पाय चाटणं तुमच्या पदाला शोभत नाही याचं तरी भान आता ठेवा असं म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close