महाराष्ट्र

तलाव बांधायला “त्या” इंजिनियरला बोलवा ? बाबो…! उमापूरच्या पाझर तलावाला सांडवाच केला नाही.

✍️ सुभाष सूतार

गेवराई — सरकारी यंत्रणा किती काळजीने काम करते, याचा उत्तम नमुना पहायला मिळाला असून ; उमापूर ता. गेवराई येथील पाझर तलावाला सांडवाच नसल्याची धक्कादायक बाब, तलाव ओव्हर फ्लो झाल्यावर उघडकीस आली आहे. तहसीलदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने सांडवा करून अतिरिक्त पाणी काढून दिल्याने संभाव्य धोका टळला आहे. दरम्यान, सांडवा न करताच तलावाची निर्मिती कशी करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित राहीला आहे.

गेवराई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात सात तलाव फुटले आहेत. त्यानंतर, अनेक बाबी उघडकीस येत असून, तलावाची देखरेख करणाऱ्या संस्थेने अक्षम्य दूर्लक्ष केल्यानेच, तलावा फुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी तलावाची भिंत, सांडवा बुजविण्यात आला होता. त्या बाबत, संबंधित यंत्रणेला कळविण्यात आले होते. गाव अंतर्गत लेखी तक्रार करायला अनंत अडचणी येतात. त्यामुळे, कोणीही तक्रार दाखल करत नाही. असे असले तरी, पाझर तलाव, ज्या विभागाकडे येतो, त्यांनीच निर्णय घ्यायला हवा. परंतू , त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तलाव ओव्हर फ्लो झाले आणि फुटलेत. तालुक्यातील उमापूर परिसरात ही अनेक लहान मोठे तलाव आहेत. उमापूर जवळचा जांभळी तलाव सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने ओव्हर फ्लो झाला. तो फुटण्याची शक्यता होती. मात्र, तहसीलदार सचिन खाडे , तसेच सरपंच महेश आहेर, संग्राम नाना आहेर शरद दादा आहेर, पत्रकार अजहर ईनामदार, या सर्व पक्षीय नेत्यांनी सतर्कता दाखवून, कालव्याची एक बाजू जेसीबीने फोडून पाणी काढून दिले. पाझर तलाव निर्माण करते वेळी काही नियम अटी असतात. असे सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित विभाग व अधिकाऱ्यांनी हम करे सो कायदा…! या उक्तीनुसार काम करून कार्यभाग उरकल्याचे दिसते. तलावाची प्रत्यक्ष पहाणी केली असता, तलावाला सांडवा तयार केलेला नाही. पूर्ण भिंत नाही. भिंतीचे काम अर्धवट सोडून दिले आहे. भिंतीवर मोठ मोठी झाले उगवली आहेत. तलावाच्या पलिकडे जांभळी वस्ती आहे. पाच पंचवीस उंबरे आहेत. तलाव भरून वाहत असल्याने रस्ता पाण्यात गेला आहे. त्यामुळे, संपर्क तुटलेला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close