महाराष्ट्र

राज्य सरकारमूळे मराठा उद्योजकांना घरघर; महामंडळांतर्गत दिलेल्या कर्जाचा 3 महिन्यापासून व्याज परतावा मिळेना

बीड — संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजाला उद्योगासाठी राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ अंतर्गत देण्यात आलेल्या कर्जाचा व्याज परतावा मागील तीन महिन्यापासून मिळालेला नाही. महाराष्ट्रातील सरकार मराठा समाजाच्या नवोदित उद्योजकांवर अन्याय करत असल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले असून, जर तात्काळ कर्जाचा व्याज परतावा शासनाने दिला नाही तर रस्त्यावर उतरून मराठा समाजातील उद्योजक तीव्र आंदोलन करतील असा इशारा संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांनी दिला आहे.

मराठा समाजातील उद्योजकांच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी बीडचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड संकटानंतर कसा – बसा उद्योजक उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे . मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ अंतर्गत उद्योजकांना दिलेल्या कर्जाचा व्याज परतावा मागील तीन महिन्यापासून संबंधित बँकामध्ये जमा झालेला नाही . यामुळे बीड जिल्हयात साडेचार हजार पेक्षा अधिक उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत . बँकाकडून उद्योजकांना कर्जाच्या हप्त्यांबाबत सतत तगादा लावला जात आहे . मात्र शासन सदरील कर्जाचा व्याज परतावा चार महिन्यापासून देत नसल्याने संबंध राज्यातील उद्योजक आर्थिक संकटात सापडला आहे . तरी राज्य सरकारने तात्काळ कर्जदार उद्योजकांच्या खात्यावर व्याज परतावा द्यावा , अन्यथा उद्योजकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे . शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल असा इशारा विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर यांनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close