आपला जिल्हा

महाविकास आघाडी सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठिशी आहे

ना. धनंजय मुंडे यांच्याकडून शेतक-यांना दिलासा

गेवराई — अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका गेवराई तालुक्याला बसला असून सोयाबीन, उडीद, तूर, कापूस आणि ऊसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. काळजी करू नका, महाविकास आघाडी सरकार तुमच्या पाठिशी आहे, झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाईल असे प्रतिपादन करून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केले. गेवराई तालुक्यातील रामनगर, राजुरी मळा या भागातील शेतकर्यांच्या बांधावर जावून शेतकर्यांना धिर दिला. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे गेवराई तालुक्यातील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्याच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी माजी आ.अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासमवेत तलवाडा, रामनगर आणि राजुरी मळा या भागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधला. रामनगर येथील संतोष राधाकिसन गायकवाड आणि दत्ता राधाकिसन गायकवाड तसेच राजुरी मळा येथील कौशल्याबाई रावसाहेब शिंदे, अंजना अशोक सानप शेतकर्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेतजमीनी खरडून गेल्या असून कापूस, ऊस, सोयाबीन, उडीद व तूर आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या भेटी घेवून ना.धनंजय मुंडे आणि माजी आ.अमरसिंह पंडित यांनी त्यांना धिर दिला.

यावेळी बोलताना ना.धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, अतिवृष्टीने नुकसान झाले असले तरी खचून जावू नये. पिकांचे, घरांचे आणि पाळीव जनावरांचे नुकसान झालेले आहे त्याचे सर्व पंचनामे करून संपुर्ण नुकसान भरपाई दिली जाईल, काळजी करायचे काही कारण नाही. पिक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकर्यांची पिळवणुक होत असून त्याबाबत गांभीर्याने विचार करून सर्व शेतकर्यांना पिक विमा मिळवून दिला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी माजी आ.अमरसिंह पंडित यांनीही शेतकर्यांशी संवाद साधत त्यांना धिर दिला. महाविकास आघाडीचे सरकार आपल्या पाठिशी आहे, झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करू असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, माजी सभापती कुमार ढाकणे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, दुर्वेश यादव, सरपंच विष्णू हात्ते, बाबासाहेब आठवले, बापू गाडेकर, अक्रम सौदागर, बळीराम शिंदे, मदन शिंदे, गणेश महाराज कचरे, महेश मर्कड, विलास कुशेकर, गोपाळ यादव, दिलीप डावकर, गणपत नाटकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close