क्राईम

जिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय !

बीड — जिल्हा पुरवठा विभागातून पाच हजाराहून अधिक रेशन कार्ड गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर रेशन कार्डाचा विभाग संभाळणारा पेशकार हंगे स्वतःची जबाबदारी झटकत नायब तहसीलदाराचा बळी देण्याचा प्रयत्न करत आहे. हंगे ला पाठबळ देण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी करत आहेत. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश देऊन देखील त्याची अंमलबजावणी झाली नाही. जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणी अधिक लक्ष देऊन कारवाई करावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्याचा पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला. यामध्ये सर्वसामान्य जनता भरडून निघाली. याबरोबरच एक-दोन नव्हे तर तब्बल पाच हजाराहून अधिक रेशन कार्डांना दलालामार्फत विकण्याचं काम हा विभाग सांभाळणाऱ्या हंगे नावाच्या पेशकाराने केलं. हे रेशन कार्ड समाजविघातक शक्तींच्या हाती पडले नसतील याची शाश्वती देता येत नाही. जिल्हा पुरवठा विभाग नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत आहे. जिल्हा अधिकारी तुषार ठोंबरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रेशन कार्ड घोटाळा उघडकीस आला. यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर मलिदा लाटत राशन कार्डची काळाबाजार करणाऱ्या पांढरपेशा भामट्यांनी आपले हात झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रेशन कार्ड संभाळणाऱ्या विभागाचा पेशकार हंगेने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरू केला. तालुका पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदाराच्या माथी हे खापर फोडण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू केला आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हा मलिदा लाटण्यात सहभागी असलेल्या पूरवठा विभागातील इतर कर्मचारीही हंगेची पाठराखण करू लागले आहेत. यामध्ये निष्पाप माणसाचा बळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाच हजाराहून अधिक राशन कार्डांचे चलन नायब तहसीलदाराने फाडावे यासाठी सर्वच भामट्यांकडून दबाव टाकला जात आहे. लवकरात लवकर या प्रकरणावर चलन फाडून पडदा पडावा यासाठी संपूर्ण ताकत हंगे या कर्मचाऱ्यांने लावली आहे. याबरोबरच या प्रकरणात जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असताना अद्याप कुठलीच कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली गेली नाही. या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालत जनतेसमोर आणावे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कर्मचारी विरोधात गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close