देश विदेश

नमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल

नवी दिल्ली — गंगा स्वच्छतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष प्राधान्य दिलं. त्यासाठी नमामि गंगे अभियानाची सुरुवात केली. देशातील कोट्यवधी लोकांची जीवनवाहिनी असलेल्या गंगेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. याच गंगा नदीच्या स्वच्छतेदरम्यान मोदी सरकारनं एक भलताच पराक्रम केला आहे. तमिळनाडूतील डीएमके पक्षाचे राज्यसभेतील खासदार पी. विल्सन यांनी याबद्दलची माहिती ट्विटरवरून दिली आहे. तमिळनाडूमधून गंगा नदी वाहत नसताना राज्यात तिच्या स्वच्छतेवर निधी खर्च केला जात असल्याची माहिती विल्सन यांना सरकारकडून देण्यात आली.

राज्यसभेचे खासदार असलेले विल्सन यांनी तमिळनाडूचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलं आहे.
त्यांनी ऍडव्हॉकेट जनरल पददेखील भूषवलं आहे. विल्सन यांनी २१ जुलैला संसदेत एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला मिळालेलं उत्तर पाहून ते हैराण झाले. तमिळनाडूमधून गंगा नदी वाहत नसताना राज्यात तिच्या स्वच्छतेवर निधी खर्च केला जात असल्याची माहिती विल्सन यांना सरकारकडून देण्यात आली.

तमिळनाडूत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) अंतर्गत करण्यात आलेल्या खर्चात स्वच्छ गंगा निधीचाही समावेश आहे. विल्सन यांनी तमिळनाडूत खर्च झालेला सीएसआर निधी आणि प्रकल्पांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. निधी नेमका कुठे खर्च करण्यात आला, असा त्यांचा सवाल होता. सीएसआर निधीतील काही हिस्सा गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी खर्च झाल्याचं उत्तर त्यांना मिळालं. त्यांनी हे उत्तर ट्विटरवर शेअर केलं आहे. गंगा नदी तमिळनाडूतून वाहते याची मला कल्पना नव्हती, असा टोला त्यांनी ट्विटमधून लगावला आहे.

तमिळनाडूत गंगा नदीच्या स्वच्छतेवर किती खर्च?
सरकारनं आकडेवारीसह दिलेला तपशीलदेखील खासदार विल्सन यांनी सोबत जोडला आहे. त्यात खर्च करण्यात आलेल्या सीएसआर निधीची माहिती आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये ०.२६ कोटी म्हणजेच २६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात प्रत्येकी १३ लाख रुपये खर्च केले गेले आहेत. म्हणजेच तीन वर्षांत ५२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तमिळनाडूतून गंगा नदी वाहतच नसताना ही रक्कम खर्च करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close