आपला जिल्हा

लहरी राजा ,प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, अशीच जिल्ह्याच्या विकासाची वाट लागणार ?

बीड — खरीप हंगाम सुरू असल्यामुळे जिल्ह्यात पिक विमा, पिक कर्ज, विज, रस्ते, लसीकरणा संदर्भात पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची आयोजित आजची आढावा बैठक तब्बल पाचव्यांदा रद्द झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे प्रश्न कसे सुटणार की येणाऱ्या काळात जिल्ह्याची अशीच वाट लागणार ? असा प्रश्न आता जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. थोडक्यात लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार अन् लोकहो तुमची अशीच काठाला लागणार अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली जाऊ लागली आहे.
पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा बीड दौरा अचानक रद्द झाला. हा दौरा रद्द होण्यामागचे कारण समजू शकले नसले तरी आतापर्यंत एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल पाच वेळा आढावा बैठक रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा पिक विमा मिळाला नाही. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत कवडीची देखील मदत दीड वर्षाच्या कारकिर्दीत सरकार कडुन झाली नाही. त्यातच जिल्ह्यातील जनता लहरी राजाच्या कचाट्यात शेतकऱ्यांसह इतर जनता अडकल्यामुळे अनेक समस्यांच्या विळख्यात ती अडकली आहे. कोरोना संकट असल्यामुळे लसीकरणा संदर्भात देखील आज आढावा घेण्यात येणार होता. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने संदर्भात देखील चर्चा केली जाणार होती. यासोबतच गोरगरिबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत चालू आहे किंवा नाही याविषयी देखील चर्चे सह पुढील रूपरेखा मांडली जाणार होती. पण दौरा रद्द झाल्यामुळे ही आढावा बैठक पुन्हा एकदा बासनात गुंडाळली गेली. यापूर्वी जिल्ह्यात हजर असताना देखील पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा बैठकीकडे पाठ फिरवली. परिणामी जिल्ह्याची वाऱ्यावर सोडल्यासारखी अवस्था झाली आहे. आधीच जिल्ह्याचा विकास खुंटला गेला असताना अशी स्थिती पुन्हा पुन्हा निर्माण होत असेल तर जिल्ह्यातील जनतेच्या विकासाची पुरती वाट लागत राहणार का ? मागास जिल्ह्याचा कलंक लागलेला असाच कपाळी मिरवला जाणार का ? येणाऱ्या काळात तरी जनतेला काही प्रमाणात का होईना सुखाचे दिवस दिसतील का ? की अशीच जनता आसमानी संकटा सोबतच लहरी राजा च्या जात्यात भरडून निघणार का ? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close