महाराष्ट्र

न.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट

परळी — कोरोना संकटामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असतानाच परळी नगरपालिका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांच्या जाहिरातीवर पैशांची उधळपट्टी करत असल्याचं चित्र पाहावयास मिळालं. होर्डिंग, बॅनर व वाढदिवसाचा जल्लोष यामध्ये नागरी समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. शेवटी आपल्याच मस्तीत जल्लोष साजरा करणाऱ्या नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी व आपली समस्या मांडण्यासाठी सर्वेश्वर नगर मधील नागरिकांनी फक्त मतं मागायला येता….ओ…शेठ…. तुम्ही नादच केला थेट अशा आशयाच बॅनर लावत चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. निदान आतातरी नगरपालिका जागी होऊन सामाजिक न्याय देईल काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.


एकीकडे कोरोना संकटामुळे धन्वंतरी असलेल्या वैद्यनाथाचे मंदिर बंद असल्यामुळे नागरिकांच होत्याचं नव्हतं केलं रोजगाराची समस्या उभी राहिली. खायला महाग झाली. लादलेल्या निर्बंधांमुळे जनता पिळवटून निघाली. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं चित्र या संकट काळात पाहायला मिळालं. अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास दीड — दोन वर्षाच्या कारकिर्दीत कवडीची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्यांचा आकडा कमी झाला नाही. कोरोना संकटात आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर गेल्याचे चित्र पहावयास मिळालं अशा स्थितीत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. अशा एक ना अनेक समस्यांनी परळी सह जिल्ह्यातील जनतेची पुरती वाट लागली.जनतेला सावरण्याची ही वेळ असताना स्वतःला लोकनेते व स्व. गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणवून घेणारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठ्या उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. यामध्ये परळीची नगरपालिका देखील सहभागी झाली.शहरात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण शहरात मोठ मोठे बॅनर, होर्डिंग्जची दाटीवाटीने लावण्यात आले आहेत. यामध्ये नगरपालिका नागरी सुविधांकडे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नागरी समस्यांबाबत विरोधकांनी आवाज उठवणे गरजेचे असले तरी विरोधक असलेला पंकजा ताईंचा भाजप कोमात आहे. परिणामी सामाजिक न्यायाला परळी शहरात मुठमाती मिळाल्यामुळे
आता जनतेला रस्त्यावर उतरण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे.

सुर्वेश्वरनगरच्या जनतेची बॅनर गिरी...
सुर्वेश्वरनगरच्या प्रवेशद्वारावर जनतेने सध्या एक बॅनर झळकवत आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.यामध्ये ” जाहीर निवेदन ” अशा मथळ्याखाली संदेश आहे.तसेच या भागातील खराब व खोदुन ठेवलेल्या रस्त्यांची छायाचित्रे आहेत. “कुणी रस्ता देता का रस्ता….? सुर्वेश्वरनगरचा रस्ता झालाच पाहिजे ! सुर्वेश्वरनगर प्रभागातील चेम्बरचे काम अर्धवट केले आहे.सुर्वेश्वर मंदिरच्या सभोवतालचा सर्व रस्ता उकरुन ठेवला आहे.नगरसेवक कधीच आले नाहीत.यामुळे वार्ड क्रमांक १४ ला कोणीही वाली आहे की नाही असा प्रश्न सुर्वेश्वरनगर वासियांना भेडसावत आहे.रस्त्याच्या कामाकडे आता तरी लक्ष द्या.या भागातील रस्ते आता तरी नीट करा. फक्त मतं मागायला येता.…ओ…शेठ…. तुम्ही नादच केला थेट ” असा लक्षवेधी मजकूर टाकत अनोखी शक्कल लढवत नागरी समस्या मांडली आहे मांडली आहे.
 ही आहे समस्या
110 कोटी रुपये बजेट असलेल्या भुयारी गटार योजना व मलनिस्सारण प्रकल्प कामामुळे रस्त्यांची चाळणी करण्यात आली आहे. यातच सुर्वेश्वर नगर भागातील रस्ता तब्बल एक वर्षापासून उखडून ठेवला आहे. त्यामुळे अनेक वेळा जनतेला अपघातांना सामोरे जावे लागले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पुन्हा कोरोना संक्रमणाची तिसरी लाट येणार असल्याचं म्हटलं जात असल्यामुळे जनतेत आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु स्वतःच्या वाढदिवसासाठी लाखो रुपये खर्च करत नगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी करणारे लोकनेते जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतील का? ज्या विभागाचे ते मंत्री आहेत त्याचे ” सामाजिक न्याय “असलेले नाव सार्थकी ठरवतील काय ? येणाऱ्या काळात तरी सत्ताधारी व विरोधकांच्या आडकीत्यात सापडलेल्या परळीकरांची सुटका होईल काय ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close