संपादकीय

सुषमा मोरगांवकर – स्त्रीत्वाचा गौरव ✍️  सुभाष सुतार  ✍️

समाजसेवेचा वसा घेतलेली अनेक माणसे आपण पहात आलोय, अशी भली माणस आपल संपूर्ण आयुष्य समर्पित करतात. समाजाचा घटक म्हणून उत्तरदायित्व पार पाडतात. खर म्हणजे, हे कार्य तसे अवघड असते.

त्यासाठी, मनाची तयारी असावी लागते. फातिमा बी, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचलय. त्यांच्याच पाऊल वाटेवरून एका शिक्षिकेने, स्त्रीत्वाचा गौरव वाढविला आहे. निरागस बालकांना आकार देऊन संस्कारक्षम केलय.
हे दायित्व पार पाडताना त्यांनी खूप कष्ट उपसलेत. सलग चौदा वर्ष सेवेत राहून, अल्पशा मानधनावर विद्यार्थ्यांच्या मनात “ज्ञानदीप” लावलाय. एखाद्या परिकथेतील गोष्ट वाटावी, असा त्यांचा प्रवास राहीला आहे. एका अर्थाने, त्यांची सेवा म्हणजे परीसस्पर्श ठरावा.
वीस वर्ष झाली. त्या, मराठवाडय़ाची शिक्षण पंढरी म्हणून ओळख असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या, श्री चिंतेश्वर विद्यालयात प्राथमिक शिक्षिका ते प्राथमिक शाळा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कुलगुरू शिवाजीराव भोसले सांगायचे, शिक्षणाच्या व्यासपीठावर स्त्रीत्वाला वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकेल, मात्र त्यासाठी, लहान मुला – मुलींच्या वाट्याला “चांगल्या बाई” यायला हव्यात. कारण, ही लहान मुल शाळाच चुकवत नाहीत. या अर्थाने, सुषमा सूर्यकांत मोरगांवकर यांनी, संस्कार केंद्र प्रमुख (मुख्याध्यापक) म्हणून ओळख निर्माण करून, शैक्षणिक कर्तव्य पार पाडले आहे. आदर्श पत्नी, मुलांची आई, आई – बाबांची ताई, सासूबाईंची आवडती केतकी आणि विद्यार्थ्यांच्या आवडत्या “बाई” म्हणून लोकप्रिय झालेल्या सुषमा ताईंच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा.
भारतीय शिक्षण मंडळाच्या संस्थेने
शहरातल्या (गेवराई-बीड) मोटे गल्लीत प्राथमिक शाळा सुरू झाली आणि योगायोगाने सुषमातांईना येथे जाॅब मिळाला. परंतू, कसलाही
अनुभव नव्हता. त्यामुळे सुरूवात तशी अडखळत झाली. शाळेच्या संचालक मंडळाने खंबीर पाठींबा दिला. या कार्यात डाँ.कै. बालकिसन झंवर, कै.दिगंबरराव जोशी यांनी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. अल्पसे मानधन मिळत असतांना, या माऊलीने किती वर्ष ज्ञानदान केले ? जवळपास चौदा वर्ष…! त्यांच बीएड झाल..1994 साली. सन 2000 सालात त्यांना प्राथमिक शिक्षिका म्हणून संधी मिळाली.
ही माऊली निरागस मुलांच्या हितासाठी, निरलस भावनेतून समाजसेवेचा उद्देश ठेवून प्राथमिक शिक्षिकचे व्रत स्वीकारले. हे करताना
कसलीही अपेक्षा नाही. असली तरी त्याचा काहीएक उपयोग नव्हता. कारण, प्राथमिक शाळा कायमविना अनुदानित तत्वावर सुरू झाली होती. पगार किती ? तुम्ही विचारायचे नाही आणि आपण सांगायचे नाही. झाकली मूठ….सव्वालाखाची. असे असताना, एक
संवेदनशील, हळवी, प्रमाणिक
आणि कर्तव्य कठोर शिक्षिका म्हणून त्यांच कर्तृत्व त्यांनीच सिद्ध केलय. त्यामुळेच ,त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका झाल्यात. आयुष्याचा पाठीराखा म्हणून उभा राहीलेला पती, ते ही शिक्षक. त्यांनीच पत्नीला चार हिताच्या गोष्टी सांगितल्या. तुला काम करायच तर मन लावून कर..! बघ, समाजसेवा म्हणून करणार असशील तर कर तुला नक्की मुलामुलींचे आशीर्वाद मिळतील. आपला पाठीराखा आपल्या पाठीशी उभा आहे ना, मग कशाची चिंता. नौकरी कशी का असेना, त्यांनी ठरवले आणि झोकून देऊन सुरूवात केली. गमंत म्हणजे त्या एकट्याच होत्या. चालत राहील्या. लहान मुलांमध्ये रमल्या आणि मुलांनाही त्यांचा लळा लागला.
त्यांचे तालासुरातले बडबड गीत मुलांना खूप आवडायचे. बाईनी वर्गाच्या बाहेर जाऊच नये, असा भाव बालकांचा असायचा. चिमुकल्या बाळांना एवढ्या त्या आवडत आहेत.
वर्ग सुरू झाले. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीचा वर्ग भरू लागला. शहरात आणि खास करून घराजवळ असलेली शाळा पालकांना सुरक्षित वाटायची. शाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. वर्ग वाढ होत होती. संस्था आणि सुषमा ताईंना
आनंद वाटू लागला. मात्र, एका वर्षी ताईंची चांगलीच तारांबळ उडाली. त्याचे झाले असे की, वर्ग वाढ करण्यासाठी त्यांनी शिक्षण विभागाला अर्ज केला. परंतू , त्यावर काही निर्णय होईना. त्यात, परीक्षा जवळ आलेली.
त्या वैतागल्या. सलग तीन दिवस शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवले. सकाळी उठायच्या, कार्यालयीन वेळेत बीडला जायच्या, दिवसभर झाडाखाली बसायच्या. अधिकारी यायचे आणि थांबा म्हणायचे. काय करावे कळेना. फाईलवर सहीच होईना. अक्षरश: दिवसभर कार्यालयात आणि रात्री आईच्या घरी मुक्काम करायची वेळ आली. त्याच वेळी लहान मुलगा आजारी पडला.
वर्ग वाढीकडे दुर्लक्ष केले तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल की काय, अशी चिंता वाटू लागली. अखेर, त्यांनी जेष्ट पत्रकार आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्यवाह, जेष्ठ पत्रकार सतीश पत्की सरांना समस्या सांगितली आणि पाच मिनिटात वर्ग वाढीचे पत्र त्यांच्या हाती पडले. खर पाहता, चिंतेश्वर विद्यालय, कष्टप्रद प्रयत्न करून उभे राहीले आहे. आधी बालवाडीची साधी खोली होती. त्यानंतर, संस्थेने स्वतःची जागा घेतली. आता, या जागेवर मनासारखी सुंदर इमारत उभी राहीली आहे. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , पालकांचा वाटा आहे. अनेक संकटे आली. शहरात घडलेल्या एका गंभीर घटनेने शाळेपुढे “यक्ष” प्रश्न उभा राहीला. पालक टीसी साठी येऊ लागले. अशा कठीण प्रसंगाला शिक्षकांनी समर्थपणे तोंड दिले. विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित ये-जा करता यावी म्हणून, शिक्षकांची साखळी तयार करून मोरगांवकर यांनी पालकांचा विश्वास संपादन केला. या कठीण प्रसंगात डाँ.वैद्य,
कुलकर्णी ,कार्यवाह
डोळे,पत्की यांनी शाळेला मानसिक आधार दिला. “ब्रेन ड्रेन” ही भारतापूढे असलेली समस्या थांबवणे हे या संस्थेचे धोरण राहीले आहे. विद्यार्थी हित आणि तोच केन्द्र बिंदू, या न्यायाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, शाळेने नवनिर्माण क्षमतेला वाव मिळेल, अशी साखळी तयार केली. उदा. म्हणून, दोन वर्ष विना दप्तर शाळेचा प्रयोग, नाट्यमय परिपाठ घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला आहे. सुषमा ताईंच माहेर बीडचं, वडील श्री मोरगांवकर मिलिट्रीत होते. आई गृहिणी म्हणून कार्यरत होत्या. आईच्या संस्कारात वाढलेल्या ताईंच शिक्षण चंपावती विद्यालयात प्राथमिक शिक्षण आणि सिद्धेश्वर विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले आहे. त्यांना या क्षेत्राची आवड ही होती.
ताईंना, भ्रष्टाचाराची कीड नकोशी वाटते. विशेषत: शिक्षणा सारख्या संस्कार केन्द्रात त्याचा लवलेश ही दिसू नये, या मतावर त्या ठाम दिसतात. म्हणून मग, पैसे देऊन नौकरी करायच्या भानगडीत न पडता , गृहणी म्हणून चालत्या झाल्या. त्यांना संधी चालून आली. त्या संधीच त्यांनी सोन केले आहे. आजही काही शिक्षकांना विनावेतन काम करावे लागते त्याचे त्यांना वाईट वाटते. नाही म्हणल तरी, मानसिक त्रास होतोच. हे मळभ जायला हवे, शिक्षकांना “समान वेतन” असावे. त्यांचा प्रश्न ऐरणीवर न राहता निकाली निघावा, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या मोरगांवकर यांच्यातले सजग नागरिकत्व प्रकट होत जाते. त्यांनी गंभीर विषयाची पुस्तके वाचण्यांचा छंद जोपासला आहे. सुधा मूर्ती, रमाई, बाबा आमटे,नरेंद्र जाधव यांची पुस्तके वाचून काढली. त्या साहित्य रसिक तर आहेतच, त्यासोबत त्यांना थोडेपार लिहायला ही आवडते.
शैक्षणिक विषय त्यांच्या लेखाचे विषय राहीलेत. पंचकोश विकसन, या शैक्षणिक विषयावर त्यांनी शोध निबंध लिहून काढलाय. तो प्रसिद्ध ही झाला आहे. शैक्षणिक व्यासपीठावर शोध निबंधाचे खूप कौतुक झाले आहे. त्यांना लाईफ इन्शुरन्सच्या वतीने आदर्श शिक्षक पूरस्कार ही प्राप्त झाला आहे. अशा गुणी, शाळेत संस्कार केन्द्र प्रमुख म्हणून यश संपादन करणार्‍या सुषमा ताईंना मनापासून शुभेच्छा..! ताई, तुम्ही केलेली सेवा म्हणजे एका अर्थाने सामाजिक ॠण आहे. तुमच्या कार्याला कर्तृत्वाचे झुंबर लागले आहेत. ताई, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, अशी चिंतेश्वराच्या चरणी प्रार्थना.
मैं देश धरा की आशा हूं…!
मैं प्रीत प्यार की भाषा हूं…!

               ✍️       सुभाष सुतार.   ✍️
                          ( पत्रकार )

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close