आपला जिल्हा

इनामी जमिनीचे घेतलेले फेरफार रद्द करण्याचे आदेश कारवाई न केल्यास होणार कारवाई

बीड —  गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यातील देवस्थान आणि ईनामी जमिनींची विल्हेवाट लागली आहे. याला दस्तुरखुद्द महसूल विभाग कारणीभूत असून या विभागात चालू असलेला प्रचंड भ्रष्टाचार इनामी जमिनीची विल्हेवाट लावण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. मात्र जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतलेल्या कठोर भूमिके नंतर आणि राज्य शासनाने जन आंदोलनाच्या तक्रारी वर दिलेल्या आदेशानंतर आता कारवाईचा निर्णय घेतला आहे.सन २०१८ नंतर घेतलेले सर्व फेरफार रद्द करून नवीन फेरफार न घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या निर्देशांचे पालन न करणाऱ्यावर आता आपण कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड.अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

तत्कालिन उप जिल्हाधिकारी एन. आर. शेळके हे बडतर्फ आहेत. सन २०१८ मधील व पूर्वीचे देवस्थान इनाम जमिनीबाबतचे बोगस आदेश असतानाही तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी यावर कुठलीही खात्री न करता फेरफार घेतलेले आहेत. अशा स्वरूपाची गंभीर तक्रारी जन आंदोलनाने राज्य शासनाकडे केली आहे. राज्य सरकारने देखील याची तात्काळ दखल घेत, त्याच दिवशी औरंगाबाद पर्यंत आदेश पाठवून तात्काळ चौकशी करण्याचे कळवले होते.

यानंतर पुन्हा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत पूर्वीच्या आदेशाची नोंद सातबाराला घेण्यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाची पूर्व परवानगी घेऊन कागदपत्रांची सत्यता पडताळून आदेश द्यावेत. याशिवाय कुठलाही फेरफार मंजूर करू नये, असे सक्त आदेश बजावले आहेत.

मागील वर्षापासून देवस्थान आणि इनाम जमिनी बाबतच्या आज पर्यंत अशा घेतलेल्या सर्व नोंदी उप विभागीय अधिकारी यांनी तात्काळ रद्द करावेत, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ही बाब देखील इनामी जमिनी आणि देवस्थान जमिनी वाचवण्यासाठी आशादायक आहे.

दरम्यान तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी अशी बाब उपविभागीय अधिकारी यांचे निदर्शनास आणून सदर फेरफार यांचे पूर्णविलोकन करून करून घ्यावे आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावा, असेही बजावले आहे. यात कसूर करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसिलदार यांचे विरोधात गंभीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

महसूल विभागातील उप जिल्हाधिकारी सामान्य पदावर प्रकाश आघाव हे उप जिल्हाधिकारी कार्यालय कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवण्याची त्यांची जबाबदारी होती आणि आहे. परंतु जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानंतर पत्र पुढे पाठवण्या शिवाय ते कोणतीही भूमिका घेत नाहीत आणि यांच्या कार्यकाळा मध्ये नोंदी द्वारे आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे इनामी आणि देवस्थान जमिनीची विल्हेवाट लागत असताना हे उप जिल्हाधिकारी कोणतीही कठोर भूमिका घेत नसल्याने केवळ कागदी घोडे पुढे पाठवणे, एवढेच त्यांचे काम चालू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाचे पालन न करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांचेवर याच आदेशात म्हटल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई तात्काळ होणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांचे ज्यांचे फेरफार रद्द होणे बाकी आहे, अशा सर्व त्रस्त जनतेने आणि या जमिनीशी संबंधित असलेल्या व्यक्तीने या दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे तात्काळ नोंदवावी, असेही देशमुख यांनी म्हटले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close