आरोग्य व शिक्षण

लातूर येथे देशातील पहिल्या मोफत ऑटिजम सेंटर (स्वमग्नता उपचार व पुनर्वसन केंद्र) व सेन्सरी पार्कचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर —-  लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व सिद्धिविनायक प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ऑटिजम सेंटरचे (स्वमग्नता उपचार व पुनर्वसन केंद्र) चे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या हस्ते सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, लातूरचे पालकमंत्री ना. अमित भैय्या देशमुख, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील आदींच्या उपस्थितीत आज संपन्न झाले.

स्वमग्नता व तत्सम आजारांवर योग्य निदान व उपचार करून अशा बालकांचे पुनर्वसन मोफत करणारे हे देशातील पहिले सेंटर असून, हे सेंटर अत्यानुधिक सोयी सुविधांनी युक्त आहे.

सामाजिक न्याय विभागाची धुरा विकासाभिमुख व्यक्तीच्या हाती असल्याचा आनंद हे केंद्र पाहिल्यानंतर होतो आहे, अशा शब्दात ना. जयंतराव पाटील यांनी सामाजिक न्याय विभागाच्या या अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.

स्वमग्नता, बहुविकलांगता, अतिचंचलपणा यांसारखे आजार कायम स्वरूपी नसून, त्यांचे वेळीच निदान करून योग्य उपचार केल्यास त्यावर सहज मात करून संबंधित बालक सामान्य जीवन व्यतीत करू शकते, याचाच विचार करत लातूरच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटिजम सेंटर उभारण्याचे ध्येय सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सिद्धिविनायक प्रतिष्ठान यासह हे सेंटर उभारणीसाठी योगदान दिलेल्या सर्वांचे यावेळी धनंजय मुंडे यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, लातूरचे पालकमंत्री ना. अमित भैय्या देशमुख, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, आ. बाबासाहेब पाटील लातूरचे महापौर विक्रम गोजमगुंडे,जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषद सीईओ अभिनव गोयल, जि. प. समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त दिलीप राठोड, सहाय्यक आयुक्त चिकुरते यांसह संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

अद्ययावत सेन्सरी पार्क…

जिल्हा समाज कल्याण विभागाने जवळपास 1 कोटी रुपये जि. प. दिव्यांग निधीतून खर्च करून एका पडक्या शाळेचे नंदनवन केले असून, या प्रकल्पात केरळ राज्यातील त्रिचुरा येथील सेन्सरी पार्कच्या धर्तीवर या आजाराने ग्रस्त बालकांवर उपचारासाठी उपयुक्त असणारा सेन्सरी पार्क उभारला आहे.

उद्घाटन होण्याआधीच 500 मुले उपचारासाठी दाखल..

या आस्थापनेमध्ये ऑटिजम अर्थात स्वमग्नता, बहुविकलांगता, सेलेवर पल्स, बुध्यांक मापन, अति चंचलपणा, या सारख्या दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी तसेच अस्थिव्यंग असलेल्या बालकाना थेरपी देण्यासाठी सर्व अद्ययावत उपकरणे व तज्ञ व्यक्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या आस्थापनेचे उद्घाटन होण्यापूर्वीच इथे वेगवेगळ्या आजारांची 500 मुले दाखल असून त्यातील काही मुले योग्य उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन घरी देखील गेले असल्याची माहिती सीईओ अभिनव गोयल यांनी दिली.

दरम्यान राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लहान मुलांची शाळा बंद असून स्वमग्नता तसेच मोबाईलच्या अतिरेकामुळे अन्य मानसिक आजारांना बळी पडत आहेत, अशा परिस्थितीत हा प्रकल्प पथदर्शी असून, संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा प्रयोग करण्याचा मानस ना. धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close