महाराष्ट्र

श्री शांतीलालजी छाजेड यांचे निधन

बीड –येथील जैन श्रावक संघाचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री शांतीलालजी नारायणदासजी छाजेड यांचे सोमवार दिनांक 21जून 2021 रोजी दुपारी एक च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी निधन झाले मृत्युसमयी त्यांनी जैन धर्मात पवित्र समजले जाणारे संथारा व्रत धारण केले होते .त्यांचे वय 85 वर्षे होते त्यांच्यावर येथील अमरधाम स्मशानभूमीत आप्तस्वकीयांच्या उपस्थितीतअंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सर्वश्री विजय कुमारजी खिवसरा एडवोकेट रतिलालजी भंडारी , धनराजजी कांकरिया(परभणी), प्रकाशजी गादीया(खेड), रामलालजी छाजेड,कुमारपाळजी श्रीश्रीमाळ(पुणे) यांनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.

मूळ चकलांबा येथील रहिवासी असलेले शांतीलालजी यांची जन्म व कर्मभूमी चकलांबाच! चकलांब्याच्या सामाजिक, व्यावसायिक, अध्यात्मिक, सहकार जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. शेतीबद्दल त्यांना प्रचंड आकर्षण होते, बीडला स्थायिक झाल्यावर ही गावाकडील शेतीमध्ये जातीने अगदी शेवटपर्यंत लक्ष देत होते. त्यांचे राहनीमान जसे रुबाबदार होते तशीच त्यांची विचारसरणी प्रगल्भ होती. अचूक निर्णयक्षमता, प्रसंगानुरूप संयम, ठरविलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठीची धडपड, व्यवहारिक ज्ञान त्यांच्याकडे असल्याने अनेक अडचणींवर मात करून त्यांनी मोठी प्रगती साधली. आपल्या मुलामुलींवर त्यांनी केलेल्या याच उत्तम संस्कारामुळे सर्वांनी आपापल्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. त्यांच्याकडे अनेक जन मार्गदर्शन घेण्यासाठी मुद्दामहून जात. चकलांबा येथे जैन समाजाची मोठी वस्ती त्याकाळी होती मात्र साधू संत आल्यावर त्यांना थांबण्यासाठी मोठी गैरसोय व्हायची याची खंत त्यांना असायची म्हणून त्यांनी आपले जेष्ठ बंधू स्व.कन्ह्यालालजी यांना बरोबर घेऊन विविध ठिकाणाहून स्वतः च्या देणगी बरोबरच निधी संकलन केले आणि गावी प्रशस्त जैन स्थानक”आत्मसाधना” ची निर्मिती केली. त्यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या धर्मस्थानकाला गावातील समाज बांधवांनीही तन-मन-धनाने साथ दिली. सात भाऊ आणि एक बहीण अशा मोठ्या परिवाराचे प्रमुख म्हणून वावरताना त्यांच्या बंधूनी,इतर सदस्यांनी, गावातील जनतेने नेहमीच त्यांचा मान राखला. त्यांच्या सद्गुणांमुळे त्यांच्याबद्दल कायम आदरयुक्त भीती होती. बीडच्या श्री संघातही त्यांना मोठा मान होता. मुले मोठी झाल्यावर त्यांची योग्य दिशेने होत असलेली वाटचाल पाहून त्यांना होणारा आनंद अवर्णनीय होता.आणि हीच वेळ साधून त्यांनी निवृत्तीचे जीवन स्वीकारले होते कारण मुलांवर, नातवंडावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. धार्मिक स्वाध्याय, साधुसंताचा सहवास,पारिवारिक कार्यक्रमातील उपस्थिती, आलेल्या अतिथीचा पाहुणचार व आपुलकीने विचारपूस,गरजवंतांना मदत , मार्गदर्शन असा त्यांचा दिनक्रम निश्चित झाला.आज खूप मोठी वैभवसंपन्नता त्यांच्याजवळ होती मात्र त्याचा त्यांनी कधी गर्व बाळगला नाही आणि हीच शिकवण ते अनेकांना देत राहिले.
त्यांच्या जीवनाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे आणि त्यांच्या धर्मपत्नीचे एकमेकांवर असलेले निरतिशय प्रेम!’ तू तिथे मी'” ही उक्ती त्यांनी जीवनभर पाळली. स्व.शांतीलालजीच्या जवळपास 65 वर्ष वैवाहिक जीवनात त्यांना प्रत्येक प्रसंगात तोलामोलाची साथ त्यांच्या धर्मपत्नी स्व.सौ. रुख्मिनीबाई यांनी दिली. तीन महिन्यापूर्वीच धर्मपत्नीचे निधन झाले.हा आघात स्व. शांतीलालजी सहन करू शकले नाहीत आणि त्याच दिवसापासून त्यांची प्रकृती खालावत गेली. कुटुंबीयांनी बीडसह,पुणे, औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले मात्र उपयोग झाला नाही. शेवटी त्यांच्या इच्छानुसार संथाराव्रत(समाधीमरण) स्वीकारले आणि देह त्याग केला. तत्पूर्वी गतवर्षी त्यांच्या मुलांनी सुवर्णशिडीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. जुन्या पिढीतील “मार्गदर्शक”आणि कुटुंबाचा” आधारवड” गेल्याची भावना यावेळी व्यक्त होत होती. त्यांच्या पश्चात पारस इलेक्ट्रॉनिकस् चे पारस आणि अभय ही 2 मुले, 7 मुली, सुना, जावई,नातवंडे, पंतवंडे, 5 भाऊ, असा मोठा परिवार आहे.दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close