आपला जिल्हा

मुक्यांना संजीवनी देणारे शेतकरी मित्र : डॉ. श्रीराम काळम…!✍️सूभाष सूतार ✍️

जिंदगी के सफर मे… गुजर जाते है, जो मकाम..!

ओ ऽऽऽऽ फिर नही आते,
ओ ऽऽऽऽ फिर नही आते..!
खूप जुन्या काळी गाजलेले, भावनिक “टच” असलेले आणि किशोर कुमार यांच्या गोड आवाजातले
हे गित आहे. या गिताची आठवण येण्याच्या मागे एक आशय आहे. या निमित्ताने, मुक्या प्राण्यांसाठी आयुष्यभर कार्यमग्न राहणाऱ्या एका संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. सेवानिवृत्त पशू वैद्य डॉ.श्रीराम विठ्ठल काळम पाटील यांची 2 जून 2021 रोजी एक्झिट झाली. डॉक्टर काळम पाटील हे मुळचे अंबाजोगाई (बीड) येथील रहिवाशी होते. शिक्षणासाठी ते
आजोळी, राक्षसभुवन ( गेवराई-बीड ) येथे आले होते. आजोळीच रमले. चांगली माणसे भेटत गेली. या माणसांना आणि त्यांच्या पशू धनाला डॉक्टरांनी जीव लावला. तेवढे सामर्थ्य त्यांनी कष्टाने मिळवले होते. डॉक्टरांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी मुक्या जीवासाठी मेहनत घेतली. मोहाच्या वाटेकडे दुर्लक्ष करून, व्यक्तिनिष्ठ जीवनाकडे न पाहता तत्त्वनिष्ठेने पाहणाऱ्या डॉक्टरांसाठी, ही शब्द पुष्पांजली…!
मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारी असंख्य माणसे आपण पाहीली आहेत. ही माणसं , या जीवांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी झटत असतात. आपण म्हणतो ना, कामात “राम” असावा. अगदी या तत्त्वाशी एकरूप होऊन अनेकांनी मुक्या प्राण्यांना सेवा दिली आहे. त्यामध्ये “ते” उजवे राहीलेत. शासकीय सेवेतून निवृत्त होऊन ही मुक्या जिवासाठी त्यांनी त्यांचा “देह” इश्वर चरणी पडेपर्यंत कार्यरत ठेवला. त्यांच्या नावात “राम” होताच. एवढेच नाही तर त्यांनी कामात ही राम ठेवला. चोवीस तास सेवा देऊन परीसरात नाव केले. कसली चिडचिड नाही की तोरा नाही. ना, कधी अहंकारात ही आले नाहीत. ते होते जनावरांचे डॉक्टर पण एकदा ते एखाद्या गावात आले की, गावकरी त्यांना सोडायचेच नाही. नाही म्हणजे नाही..! त्यांना ही नवल वाटायचे. ते म्हणायचे, जाऊद्या ना आता. किती दिवस एकाच गावात राहू ? गावाने त्यांचे ऐकलेच नाही आणि दुसर्‍याच दिवशी त्यांची बदली रद्द झालेली असायची. ज्या ठिकाणी ते जायचे, तो परीसर कर्मभूमी मानीत आणि तल्लीन होऊन सेवा द्यायचे. समर्थ म्हणयाचे, कोमल वाणी अन सज्जन संगती दे रे राम….! विमल करणी अन बहुजन मैत्री दे रे राम..! संतांच्या वचनाला डॉक्टर शेवटपर्यंत जागले. पगारा शिवाय एक रुपया खिशात घालायचा विचार त्यांना झोपेत ही कधी आला नाही. रात्री अपरात्री कुणाचाही फोन येऊदेत, डॉक्टर “श्रीदत्त” म्हणून हजर असायचे. मुक्यांना भावना असतात. फक्त त्यांना बोलता आणि सांगता येत नाही. त्यांनी मुक्या जीवांच्या भावना जपण्याची भूमिका निभावली. त्यांच्या वेदनेवर फुंकर मारून रोगातून सुटका व्हावी म्हणून धडपड करणारा हा भला माणूस आपल्या पुण्यभूमीशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहीला. डॉ. काळम यांनी गेवराई शहरात ही तीन वर्ष सेवा दिली होती. पाच सहा वर्षांपूर्वी भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी बोलणे झाले होते. ते गेल्यावर त्याची जाणीव अधिक झाली. गावातले लोक, या देवा सारख्या माणसा विषयी भरभरून बोलत होते. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून सोशल माध्यमांवर प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे , पाऊले आपोआप राक्षसभुवनच्या दिशेने पडली. गुरूवार ता.17 रोजी गावात जाऊन डॉक्टरांच्या आठवणींना उजाळा दिला. ग्रामस्थांशी हितगूज करून माहीती गोळा केली. पास्सष्टी कडे झुकलेले रमेश नाटकर, या आजोबांना नमस्कार केला. ते थांबले. गेवराई हून आलोय, पत्रकार असल्याचे सांगून थेट प्रश्न केला. डॉक्टर काळम यांना ओळखता का ? असा प्रश्न विचारताच, त्यांचे डोळे पाणावले. मरेपर्यंत त्यांना कसे विसरता येईल…! जनावरांची सेवा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांच्या पुढे कोणी लहान-मोठा नव्हता. ते पैसे न घेता उपचार करायचे. दहा कोसावरून ऐकीव माहितीवर एवढ्या खात्रीने औषध उपचार करणारा डॉक्टर उभ्या आयुष्यात पाहीला नाही. माझ्या बैलाला ही विषबाधा झाली होती. नवीच बैलजोडी मरणाच्या दाढेत असताना, डॉक्टरांनी उपचार करून वाचवली. या घटनेला वर्ष झाल. बैल जिवंत आहेत. मात्र, आमचा हक्काचा आधार गेल्याचे दु:ख व्यक्त करताना नाटकर आजोबांचे डोळे भरून आले. डॉक्टरांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आलेली अनेक माणसे भेटली. गेवराई (बीड) चे उत्तम नाना मोटे, अविनाश मुळे (काका) , महाजन तात्या यांनी ही आठवणींना उजाळा दिला. डॉक्टरांच्या हाताला यश होते. जनावर लहान असो की मोठे , त्यांना जनावरांच्या गुण वैशिष्ट्यांचा प्रचंड अभ्यास होता. खळेगाव (गेवराई-बीड) परिसरातून एक खिल्लार जोडी डॉक्टरांना दाखवायला आणली होती. लाखाची जोडी, दिसायला देखणी होती. खिल्लार जोडीला निरखून बघत असता, त्यांनी बैलाला कॅन्सर असल्याचे निरिक्षण नोंदविले होते. इतके अचूक निदान ते करायचे. उत्तम नानांकडे दहा-पंधरा जातवाण म्हशी होत्या. त्यामुळे, डॉक्टरांशी स्नेह आला. गेवराई च्या पशु वैद्यकीय दवाखान्यात कोणी फिरकत नव्हते. त्यांच्या मुळे लोक येऊ लागले. त्यांना जनावरांची खडा न खडा माहीती असायची. रोगावर परफेक्ट उपचार त्यांचे हे सूत्र, त्यांनी केलेल्या मेहतीने त्यांना अवगत झाले होते. एवढे अचूक निदान आणि उपाय करणारे ते डॉक्टर होते. अशी आठवण ही त्यांनी सांगितली. आपण सरकारी नौकर आहोत. लोकांचे सेवक आहोत. याचा विसर पडू न देता त्यांनी सेवा धर्म पार पाडला. आयुष्यभर कधी लबाडी केली नाही. पगारावर ते समाधानी होते. शासनाचा मिळतो म्हणून त्यांनी ईबीसी सवलत नाकारली. प्रवीण ( शिक्षणाधिकारी म्हणून सेवेत आहेत.) नावाचा त्यांचा मुलगा वडलांकडे फार्म घेऊन गेला. परंतू, त्यांनी सही न करता, मुलाला सांगितले की, बाळा…आपण त्यात बसत नाही. ईबीसीची साडपाच रुपये फिस त्यांनी स्वतः भरली. त्यांच्या आयुष्यात काही गमतीशीर प्रसंग ही आले. आजारी जनावरांच्या उपचारासाठी डॉक्टर
मध्यरात्री एका खेडेगावात गेले होते. परतीच्या मार्गावर त्यांना चोरांनी अडवले. गमंतीची गोष्ट म्हणजे, एकाने त्यांना ओळखले. एवढ्या रात्री कशाला फिरतो बाबा….! जा, आता. माझी शेळी वाचवली होतीस. डॉक्टर गडबडून गेले. गाडी ही सुरू करता येईना. मग, चोरानेच गाडी सुरू करून दिली. सेवानिवृत्तीच्या काळात त्यांनी गोदाकाठी असलेल्या कर्मभूमीशी (श्रीक्षेत्र राक्षसभुवन) नाते जोडले. गाव आणि परिसरातील पशुधनावर उपचार कार्य सुरूच होते. त्या शिवाय, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या पिढीला त्यांनी मार्गदर्शन केले. वयाची जवळपास पंच्चावन वर्ष ते शासकीय सेवेत होते. त्यानंतरही सलग सतरा – अठरा वर्ष त्यांनी पशू सेवा केली. डॉक्टरांनी साधी राहणी, विचारा आचारात साधेपणा ठेवला. सरकारी सेवेतले कर्तव्य आणि सेवानिवृत्ती नंतर सामाजिक बांधिलकी जोपासली. जनावरांच्या प्रेमापोटी “हाफ शर्ट” वापरला. एकदा, गावात फेरफटका मारत असता, दावणीला बांधलेल्या एका तरण्याबांड गोर्‍ह्यावर नजर टाकली. हे जनावर पिसाळले असल्याचे सांगून उपाय सांगून डॉक्टर चालते झाले. ड्युटीवर जात असताना, वाटेत प्रसूती वेदनेने तडफडणारी गाढवीन पाहून ते तळमळले. त्यांनी तातडीने तिची सुटका केली. आजारी, बाधित जनावराच्या पाठीवर थाप मारून, डॉक्टरांनी प्रेमाने हात फिरवला की ते मुके जनावर ही शहारायचे. ही कला डॉक्टरांनाच अवगत झाली होती. आणखी एक अभिमानाची गोष्ट. ते शासकीय कार्यालयात झेंडावंदन करायचे आणि दिवसभर त्याच ठिकाणी थांबायचे. झेंडा खाली घेतल्यावरच घरी जायचे. एकुलत्या एक मुलीच्या साखरपुड्याच्या दिवशी ही त्यांनी गाईच्या उपचारालाच प्राधान्य दिले. या कार्यक्रमात…आई, मुलगा, मामा, मेहुणे एवढी सगळी नातेवाईक मंडळी असताना, आजारी गाईकडे कोण आहे. असा विचार करून त्यांनी गाडीला किक मारल्याची आठवण त्यांचे मोठे मेहुणे भाऊसाहेब नाटकर यांनी सांगितली. या “वैखरीच्या वाटेवरून” चालणाऱ्या डॉक्टरांनी मरेपर्यंत मुक्या जीवांची काळजी वाहिली. मातीचीही सेवा केली. ते प्रगतशील शेतकरी होते. शेतीत नविन प्रयोग करून शेतीला जोडधंद्यातून उभारी देता येईल, असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांच्या निधनाने एका शेतकरी मित्राचा शेवट झाला आहे. आता येणे नाही जाणे नाही. त्यांचा सहवास ज्यांना लाभला ते धन्य झाले. डॉक्टर, तुम्ही….मुक्या जीवावर उपचार करून माणसाच्या चेहर्‍यावर हास्य फुलविले आहे. अशा असंख्य आठवणी मनाच्या हिंदोळ्यावर कायम कोरल्यात. तुमचा विसर कधी ही पडणार नाही. तुम्ही कधी ना उतलात, ना मातलात. घेतला वसा “माणूस” म्हणून पूर्ण केलात. एक संवाद आठवला. जिंदगी लंबी नही, बडी होई चाहिऐ…..! डॉ. श्रीराम काळम पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली….!

                      ✍️  सुभाष सुतार✍️
( पत्रकार )

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close