क्राईम

चालकाला मारहाण करत बिस्कीटाचा कंटेनर चोरट्यांनी पळवला;चौसाळ्याजवळ घडली घटना

चौसाळा — धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून बिस्किट घेऊन जाणाऱ्या कंटेनरला चोरट्यांनी चौसाळा बायपासवर टेम्पो आडवा लावत कंटेनरच्या दोन चालकांना मारहाण केली. चोरट्यांनी हा कंटेनर रात्री साडेअकराच्या सुमारास पळवून नेला. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना मिळताच तपासाची चक्र गतिने फिरवत कंटेनर लातूर येथे पकडण्यात पोलिसांना यश आले. तीन चोरट्यांना पकडण्यात आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अस्लम खान अली व शहेबाज खान (रा. मेवात राज्य हरियाणा) हे आपला कंटेनर क्र. एम.एच. ४० डी.जे. ४५९६ यामध्ये आंध्राहून गुजरातकडे पारले बिस्कीट घेऊन जात होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चौसाळा बायपासवर कंटेनर आला असता काही चोरट्यांनी या कंटेनरला टेम्पो आडवा लावला. तसेच कंटेनर चालकांना मारहाण करत चोरट्यांनी कंटेनर पळवून नेला. या घटनेची माहिती चालकाने नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर नेकनूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे, दीपक खांडेकर, अमोल नवले, सुशांत सोनवणे, जायभाये, बाबासाहेब डोंगरे, पारधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. हा कंटेनर लातूर येथील जातेगावला असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले.पोलिसांनी हा कंटेनर जप्त करून तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. कंटेनरमध्ये पारले बिस्कीटचे १४०० बॉक्स होते, ज्याची किंमत २५ ते ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर नेकनूर पोलीस लातूर येथे रवाना झाले आहेत. दरम्यान या चोरट्यांनी चालकांना मारहाण केल्यानंतर त्यांच्याकडून नगदी २० हजार आणि दोन मोबाईलही चोरून नेले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
10 – 15 चोरट्यांनी कंटेनर पळवला–
पारले बिस्कीटचा कंटेनर चोरून नेत असताना 10 ते पंधरा चोरटे असल्याचे जखमींचे म्हणणे आहे. लातूर पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडले असून अन्य चोरटे फरार असल्याने या चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत. पकडलेल्यांपैकी दोन चोरटे हे बार्शी तालुक्यातील पारा येथील तर एक चोरटा केज तालुक्यातील नांदुरघाट येथील आहे. सदरील ही कारवाई गातेगाव येथील पोलीस कर्मचारी मुळे, चालक मोरे, होमगार्ड धावरे, ढोणे, बन्सल आदींनी केली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close