क्राईम

मागणी घातली 7 लाख हुंडा घेतला, लग्न मात्र दुसरीशी केले : वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

परळी — तुमच्या मुलीशी लग्न करतो मला लातूर येथे हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या असे म्हणून एका वैद्यकीय अधिकाऱ्यांने परळी येथील एका कुटुंबीयांना मागणी घातली. त्यानंतर साखरपुडा झाला हुंडा दिल्यानंतर या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परस्पर दुसऱ्याच मुलीशी विवाह केल्याच्या आरोपावरून वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शहरातील सोमेश्वर नगर मध्ये राहणारा डॉ.संदीप वसंतराव मंत्रे सध्या लातूर जिल्ह्यामध्ये असलेल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर डॉ संदिप मंत्रे विरुद्ध एका मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी १८ सप्टेंबर रोजी संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो अशी त्याने मागणी घातली. मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले. २३ सप्टेंबर रोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. २१ ऑक्टोबर रोजी मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न यावर्षी ५ मे रोजी करण्याचे ठरले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले. मात्र, २३ मार्चपासून संदीपने त्याचा मोबाईल बंद केला. अखेर ४ एप्रिल रोजी संदीपने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाल्याचे व्हाॅट्सॲपवर व्हिडीओ क्लिपमध्ये सांगून या लग्नास नकार दिला. केवळ लग्नास नकार देऊन संदीप शांत बसला नाही. माझे लग्न झाल्याचे सांगूनही माझा पाठलाग करण्यात येत आहे, लग्नासाठी माझ्या कुटुंबावर दबाव आणत आहेत अशा आरोपांचा व्हिडीओ करून तो नातेवाईकात पाठवून मुलीची आणि तिच्या वडिलांची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संदीपने हुंडा घेतलेल्या मुलीच्या कुटुंबियांना अंधारात ठेऊन दहा वर्षापासून ओळख असलेल्या मुलीसोबत लातूर जिल्ह्यातील रायवाडी येथील मंदिरात लग्न केले. याच मुलीसोबत लग्न करण्याचे निश्चित असतानाही संदीपने माझ्या मुलीसोबत विवाह करतो म्हणून सात लाख रुपये घेऊन फसवणूक केली असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात संदीप विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close