संपादकीय

साहेब, का गेलात हो…! ■■ ✍️ . सुभाष सुतार ✍️

3 जून, एका कटू प्रसंगाला तोंड द्यावे लागणारा दुखद प्रसंग. महाराष्ट्राचे लोकनेते, ऊसतोड मजूर – कामगारांचा सखा, बीड जिल्ह्य़ाचे भूमिपुत्र, कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारणारे दातृत्व, केन्द्रीय मंत्री ना. गोपीनाथराव मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी आली अन काळजाचा ठोका चुकला. त्या दिवशी, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब घोडके यांनी सकाळी सकाळीच फोन केला. म्हणाले, सुतार सर.. घराकडे येतोय. बाहेर या ना…! दादांनी, कातर आवाजात बातमी सांगितली. मुंडे साहेबांचा अपघात झालाय आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. विश्वासच बसेना, बापरे..! एवढेच शब्द बाहेर पडले. ते जावून आज सात वर्ष झाली. मात्र ,त्यांची आठवण येत नाही, असा एक क्षण ही जात नाही. महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते, हितचिंतकांची हिच भावना आहे. दिवस येतील जातील. मुंडे साहेब आठवणीच्या हिंदोळ्यावर कायम राहतील…!

राजकारणातल्या माणसांचा आशावाद शेवटपर्यंत ढळत नाही. कारण, आशेची माया वेडी असते. समुदायाचा नेता म्हणून, ज्यांचे कौतुक वाटते, त्यांच्याकडून अपेक्षा असतात.
मात्र, एखाद्या नेतृत्वाचा अकाली मृत्यू चटका लावून जातो. गाव, कार्यकर्ता, परीसरातील नेते एकाकी पडतात. स्वप्नांचा कडेलोट झाल्याची भावना वाढीस लागते. काय करावे कळत नाही. मानसिक धक्का बसतो. असाच एक धक्का…मुंडे साहेब गेल्यावर बसला. मृत्यू अटळ असला तरी मुंडे यांचे अकाली जाणे अनपेक्षित होते. त्यांच्याशी रिलेटेड राहून पाहीलेल्या स्वप्नांना त्यांच्या जाण्याने पूर्ण विराम मिळाला. साहेब गेल्याने
न भरून निघणारी हानी झाली. हे त्रिकालाबाधित सत्य भूतकाळी जमा झाले आहे. एवढ्या ताकदीचे नेतृत्व कधी उभे राहील, देव जाणो. कारण, एका क्षणात, दिवसात,एका वर्षात
नेतृत्व उभे राहत नाही. लोखंडाचा परीस व्हायला खूप वेळ जातो. खर म्हणजे, काळाने अन्यायच केलाय. त्याला भांडता आले असते तर बीडच्या माणसांचे चिवट लढणे कळले असते. तसे होणे नाही. त्यामुळे, काळ हुकमत गाजवत राहतो. काळाने, एका वाढत्या नेतृत्वाला हिरावून नेले आणि कार्यकर्ते पोरके झाले. आपण म्हणतोच ना, माणसात देव असतो. तो, मुंडे साहेबात दिसला. अनेकांनी पाहिला आणि अनुभवला. राजकारणात दिला जातो तो शब्द ,शब्दांच्याच गर्दीत हरवत चालला असताना, मुंडे वर्तमानात राहीले. भूतकाळात डोकावत बसले नाहीत. पुढे पहावे आणि चालत राहावे, या सूत्राचा खुबीने वापर करून, पक्ष वाढविलाच, या शिवाय शब्दाला जागणारी स्वतःची इमेज उभी केली. मुंडे चालते झाले आणि काफीला वाढत गेला.
प्रसिद्ध लेखक सुलातानपूरी यांच्या दोन ओळी आठवल्या. में ऐकाली ही चला था जानिब-ए-मंजिल, मगर लोग साथ आते गये और कारवां बनता गया…! मुंडे साहेब, लोकनेते झाले.
कुलगुरू शिवाजीराव भोसले म्हणायचे, नेता माणसे टाळणारा आणि आपल्याच विचारात रमणारा नसावा. या अर्थाने, मुंडे साहेब अपवाद राहीलेत. ते समाजप्रिय झाले. त्यासाठी खूप कष्ट केले. माणसाला माणूस जोडला. कधी काळी काँग्रेस संस्कृतीत रुळलेला जिल्हा भारतीय जनता पक्षाचा “बालेकिल्ला” म्हणून ओळखला जावू लागला. मुंडे यांनी अलिखित वारसा हक्काच्या राजकारणाला सुरूंग लावला. सामान्य घरातल्या कर्तृत्वान नेतृत्वाला संधी दिली. सहकारातली मक्तेदारी मोडीत काढून, स्वतःच्या नेतृत्वाखाली सहकार शैक्षणिक संस्था आणि सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून नवा इतिहास उभा केला. जागो जागी माणसे उभी केली. नुसती उभी करून थांबले नाहीत. कुठे मार्गदर्शन केले. तर, काहींना आर्थिक पाठबळ दिले. पाठीवर थाप मारून हात्तीचे बळ दिले. राजकारणात त्यांच्या एवढा अनुभव कोणी घेतला की नाही, माहीत नाही. परंतू , अनेक भली- बुरी माणसे त्यांनी पारखली. त्यांना गेवराई मतदारसंघाचे कौतुक वाटायचे. या परीसरात जीव देणारे माणसे मिळाली. त्यामुळे, ते म्हणायचे, या भागाला कधी ही अंतर देणार नाही. गेवराई च्या पवारांनी त्यांच्याकडे केवळ आशीर्वादाची अपेक्षा ठेवली. ना करार केला ना ,काही मागितले. त्यांना हा सुखद धक्काच होता. गेवराईतल्या पवारांना कधी ही विसरणार नाही, असे वचन देऊन, पवारांना प्रोत्साहन देणारे मुंडे साहेब “ग्रेट” होते.
एक छानशी आठवण आहे. लोकसभा निवडणुक झाली होती. ते उमेदवार होते. मोहोल खराब होता. सगळ्यांचे लक्ष “गेवराई” मतदारसंघाकडे होते. खर म्हणजे, फार काही अडचण नव्हती. परंतू , साहेबांना वाटायचे, यावेळी लीड मिळेल की नाही. मिळाली तर किती मिळेल ? गेवराई च्या पवारांची किती मदत होईल ? निकालाला वेळ होता. गणिताची जुळवाजुळव केली जात होती. निकालाला सात आठ दिवस शिल्लक असताना, एका दिवशी मला शेतकर्‍यांचे नेते, मुंडे साहेबांचे विश्वासू पाशाभाई पटेल यांचा फोन आला. ते म्हणाले, सुतार..! मी मुंडे साहेबांच्या शेजारी आहे. खर काय ते सांगायचे. एकदम रोखठोक बोला. निवडणुक झालेली आहे. मी म्हणालो. बर सर, विचारा ना..! त्यांनी विचारले, गेवराई मतदारसंघातून किती लीड मिळेल ? मी म्हणालो. सर, वीस हजाराच्या आसपास मिळायला पाहीजे. त्यांना आनंद झाला. दहा हजाराची मिळाली तरी खूप झाली. एवढेच ते बोलले. आपण नक्की भेटूयात, एवढाच संवाद झाला आणि त्यांनी निरोप घेतला. तेव्हा मी शिर्डीत, साई बांबाच्या मंदिरात होतो. निकाल जाहीर झाला तेव्हा अपेक्षा पेक्षा जास्त लीड मिळाली होती. गेवराई तालुक्यातील जनतेने मुंडे साहेबांवर जीवापाड प्रेम केल. दोन्ही वेळा त्यांना या मतदारसंघातील जनतेने मताधिक्य दिले. या प्रेमाला ते जागले. अनेक कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखायचे, पत्रकारांच्या ही ओळखी होत्या, माझी फारशी ओळख नव्हती. मात्र, काही दिवसात ओळख होईल असे वाटायचे. ती हुरहूर…कायमची राहून गेली आहे. त्यांच्या सभा कव्हर केल्यात. त्यांना दोन तीन वेळा पत्रपरिषदेत प्रश्न विचारलेत. त्या आठवणी आयुष्यभर मनाशी चिटकून राहणार आहेत.
खर म्हणजे, नेतृत्व प्रभाव सूचक असते. ते सहज निर्माण होत नाही. एखादाचा आचार, विचार, आवड, निवड, चालणे, बोलणे आवडायला लागले की, नेतृत्वाला धुमारे फुटतात. साहेबांच्या बाबतीत ही तेच झाले. कसलाही राजकीय वारसा नसताना, एका गाव खेड्यातून आलेले गोपीनाथ मुंडे मेहतीने “लोकनेते” झाले. अशी उपाधी सहजासहजी मिळत नाही. लागत ही नाही. विशेषणे लागायला, जनतेचा पाठींबा, प्रेम मिळावे लागते. साहेबांना ते मिळाले. त्यांनी खस्ता खात “समाज” गोळा केला. स्वाभिमान शिकवला. आरसा दाखवून, त्यामध्ये उद्याची आशा दाखवली आणि तीच प्रेरणा ठरली. हाच समाज पक्षाच्या झेंड्याखाली वळवला. बहुजन समाजाने ही आशीर्वाद दिला. मुंडे, महाराष्ट्राचे नेते झाले. मित्रत्व जोपासणारी प्रितिमा उभी केली. राजकारणात धूर्त पणा लागतो. मात्र, मुंडे यांनी धूर्त राजकारणाला “भलेपणा” जोडला. शब्द देऊन, तो पाळणारा नेता, अशी ओळख तयार केली. त्या ओळखीला वास्तवात आणले. पक्ष सांभाळून विरोधी गट, तट खुबीने सांभाळले. या हितसंबंधात राजकारणाला आडवे येऊ दिले नाही. मुंडे – देशमुख मैत्रीचे पर्व राज्याच्या राजकारणात अमर झाले. 1995 ला शिवसेना – भाजपाची सत्ता यायच्या आधी त्यांनी
पवार साहेबांवर त्यांनी बेफाम आरोप- प्रत्यारोप केले. खूप कटूता येईल, असे चित्र उभे राहीले पण त्या दोघांची मैत्री अभेद राहीली.
बीड जिल्हा आणि मुंडे साहेब, हे समीकरण झाले होते. मराठवाडा सोडून कोणी महाराष्ट्रात कुठेही गेला की, तुम्ही कुठले ? नुसत…बीड म्हणायचे आणि….अच्छा, तुम्ही मुंडे साहेबांच्या गावचे, एवढीच ओळख अनेकांना अचंबित करायची. खूप हर्ष वाटायचा.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्यांना मदत केली. माझा – तुझा करत बसले नाहीत. पक्षातील कार्यकर्त्यांना तर दिलेच, त्या शिवाय विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही अपेक्षा पेक्षा जास्त दिल्याच्या नोंदी आहेत. मराठवाड्यासाठी त्यांना खूप काही करायच होत. उरात एक स्वप्न होत. ते दिवस ही आले होते. केन्द्र आणि राज्य, अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांना “नेता” म्हणून अधिकार आले होते.
द्यायची वेळ आली असताना , नियतीने गतिरोध उभा केला. उमद्या नेतृत्वाला काळाने हिरावून नेले. अपरिचित हानी झाली आहे. ती कशानेच भरून निघेल, अशी अंधुकशी आशा करावी की करू नये, आता खरच भिती वाटतेय…! माणुसच….तसा होता. माणसा सारखं राहणारा रांगडा नेता, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मराठवाडय़ाशी नाळ जोडलेला एवढ्या मोठ्या उंचीचा माणुस अजून तरी झाला नाही. भाबड नावाच्या एका साध्या कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पत्नीसह
( वडगाव ढोक ता. गेवराई जि. बीड ) ते थेट मुंबई हून गेवराईला आहे. ही कसली अटॅचमेंट होती. हल्लीच्या काळात काही नेते एखादे पद मिळाले की,नाकात वारं गेल्यागत, मला वेळ म्हणतात. मात्र, मुंडे यांना शेवटच्या घटकाकडे लक्ष असायचे. ते गोदाकाठी गोदा परिक्रमा आंदोलनाच्या माध्यमातून फिरत होते. पत्रकार मित्र अँड. प्रताप खेडकर यांनी सदरील मोहीमेची लोकसत्ता दैनिकात वृत्तपत्रात दखल घेतली होती. मुंडे यांना समजल्यावर त्यांनी खेडकर यांना बोलावून घेऊन पाठीवर थाप मारून कौतुक केले होते. अशा असंख्य आठवणी आहेत.
उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेला त्यांचा कार्यकाळ संस्मरणीय राहीला. त्या काळातले गृहमंत्री पद आणि त्यांचा रूबाब भन्नाट होता. बीड च्या मातीला त्याचे विशेष कौतुक होते. त्यांचे रुबाबदार चालणे, बोलणे लोकांना आवडायचे. त्यांच प्रभावसापेक्ष व्यक्तिमत्त्व लोकांनी डोक्यावर घेतले. ते निवडणुकीतल्या सभा एकाहाती पेलायचे. त्यांची
बोलता बोलता, लांबलचक नाकावरून सहज हात फिरवण्याची खासीयत अफलातून होती. एका वाक्यात सभा काबीज करण्यात ते तरबेज तर होतेच अन हजरजबाबी ही होते. त्यांना चष्मा ही शोभून दिसायचा. मुंडे साहेबांचा रुबाबदारपणा वाहत्या पाण्यासारखा खळखळून वाहत असायचा. मुंडे म्हणजे “जादूची कांडी” म्हणून नावाजले गेले. जबरदस्त हातखंडा असलेला “लोकनेता” मुंडे यांच्या रूपात महाराष्ट्राने पाहिला.
कुशल संघटक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले. निग्रही राहून जीवनमूल्य सांभाळून स्वत:ची उंची निर्माण करून, राजकीय वर्तुळात हुकमत गाजवली. कधी काळी नेहरू नंतर कोण असा प्रश्न उपस्थित केला जायचा. वास्तविक पाहता, नेतृत्व येत आणि जात. मात्र, एखादी पोकळी भरायला खूप वेळ लागतो. काही वेळा, ती तशीच राहते….भळभळत्या जखमे सारखी. मुंडेचे नेतृत्व सिद्ध झालेले होते. विशिष्ट लोकांचा पक्ष म्हणून शिक्का मारलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यात बहुजनाचा चेहरा दिला. पक्ष ही अनुकूल राहीला. त्यामुळे, कोणी ओबीसी “नेता” आव्हान देईल, अशी शक्यता जवळपास दिसत नव्हती. असे असताना, मराठवाड्याला कुणाची दृष्ट लागली, देव जाणो. देशमुख, मुंडे आणि सातव, हे तिघेही नेते अकाली गेले. मुंडे साहेब गेल्यावर , त्यांची जागा घेणारा अद्याप तरी दिसत नाही. कोणी होईल की नाही. सांगता येत नाही. अब्राहम लिंकन म्हणायचे, तावून सुलाखून निघाल्या शिवाय लोखंडाचे पोलाद होत नाही. मग, जनतेसाठी , मुंडे साहेबां एवढा जीव जाळणारा नेता मराठवाड्याच्या मातीतून उभा राहील ? असा यक्ष प्रश्न कोणी विचारला तर कोण उत्तर देईल..? वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांना विनम्र अभिवादन.

                 ✍️    सुभाष सुतार  ✍️
( पत्रकार )

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close