आपला जिल्हा

मायलेकींसह पुतणीचा गोदावरीत बुडून मृत्यू

गेवराई — धुणं धुण्यासाठी गोदावरी पात्रात गेल्यानंतर सोबत असलेल्या 3 मुली पाण्यात खेळत असताना बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय महिलेसह दोन मुलींचा यावेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मीरगाव नजीक घडली. मृतांमध्ये मायलेकीसह पुतणीचा समावेश आहे तर एका मुलीला वाचवण्यात यश आले.

मिरगाव येथील रंजना भागवत गोडबोले वय 30 वर्षे, त्यांची मुलगी अर्चना भागवत गोडबोले, पुतणी शीतल हनुमंत गोडबोले वय 18 वर्षे व भावकीतील आरती बाबासाहेब गोडबोले या चौघी आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गावा नजीक असलेल्या गोदा पात्रात धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. रंजना गोडबोले या धुणं धूत असताना तीन मुली गोदा पात्रातील पाण्यात खेळत होत्या. त्यावेळी अचानक त्या तिघीही खोल पाण्यात गेल्या.तेव्हा त्यांना पाण्यात बुडत असल्याचे पाहून मोठ्या हिमतीने रंजना गोडबोले यांनी पाण्यात जावून मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात आरती गोडबोले हिस पाण्यातून उचलून गोदाकाठी आणून ठेवले तर अर्चना व शितल यांना वाचवण्यासाठी रंजना पुन्हा पाण्यात गेल्या मात्र रंजना अर्चना व शितल यांना वाचवत असताना या तिघीही पाण्यात बुडून मरण पावल्या. मृतांमध्ये मायलेकीसह पुतणीचा समावेश आहे. या घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर तलवाडा पोलिस ठाण्याचे स पो नि प्रताप नवघरे, पीएसआय माने, एएसआय राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत गावकर्‍यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनास्थळाचा पंचनामा केला. या वेळी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे, अल्ताफ कुरेशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या घटनेने मिरगावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान ही घटना घडत असताना आरडाओरड झाली. त्यावेळी बाजुला मासे पकडणारा गोपाल बलिया याने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र घटनेची जागा आणि तो मासे पकडत असलेली जागा यातील अंतर बरच असल्याने तो घटनास्थळी वेळेत येऊ शकला नाही. तो तिथपर्यंत आला तोपर्यंत तिघेही मृत्युमुखी पडल्या होत्या. त्या तिघींनाही गोपाल यानेच पाण्याबाहेर काढले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close