कृषीवार्ता

खरीप पीक कर्ज वाटपासाठी उद्दिष्ट सोळाशे कोटी आणि वाटप फक्त 35 कोटी– शेतकऱ्यांना वेठीला धरू नका

अँड. अजित देशमुख

बीड —  एकीकडे कोरोणामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. अनेकांच्या शेतातील भाजीपाला आणि फळ पिकाची वाट लागली आहे. त्यातच आता खरिपाची पेरणी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात खरीप २०२१ साठी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सोळाशे कोटी एवढे ठेवले आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील अठरा बँकांनी मिळून केवळ पसतीस कोटी एकोन पन्नास लाख रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. एकूण उद्दिष्ट पाहता ही टक्केवारी केवळ सव्वा दोन टक्के एवढी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वेठीस न धरता ताबडतोब कर्ज वाटप करावे. अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, यु. सी. ओ. बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या एकूण नऊ बँकांना सातशे चोपन्न कोटी रुपये खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र या बँकांनी केवळ एकवीस कोटी सोळा लाख रुपये एवढेच पीक कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्ट रकमेतून टक्केवारी काढली असता केवळ दोन पॉईंट एक्याऐंशी टक्के एवढेच कर्ज वाटप केले आहे.

त्याचप्रमाणे ॲक्सिस बँक, डीसीबी बँक, एच. डी. एफ. सी. बँक, आय. सी. आय सी. आय. बँक, आय. डी. बी. आय. बँक, कोटक महिंद्रा बँक, आर. बी. एल. बँक या सात बँकांना दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. मात्र या बँकांनी पाच कोटी पंचाहत्तर लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. म्हणजेच केवळ दोन पॉईंट बावन्न टक्के एवढेच उद्दिष्ट या बँकांनी साध्य केले आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँकेला चारशे दहा कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. तरी या बँकेने केवळ पाच कोटी रुपये पिक कर्ज वाटप केले आहे. ही टक्केवारी पाहता एक पॉईंट बावीस टक्के एवढेच उद्दिष्ट साध्य केले आहे.

शेतकऱ्यांची कणा समजली जाणारी दि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. बीड ही देखील झोपली असल्याचे दिसते. डीसीसी बँकेला दोनशे आठ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र या बँकेने तीन कोटी अठ्ठावन्न लाख रूपयेच वाटप केले आहेत. उद्दिष्ट पाहता वाटपाची टक्केवारी केवळ एक पॉईंट बहात्तर टक्के एवढीच येत आहे.

सर्व बँकांची एकत्रित आकडेवारी पाहता सोळाशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट या अठरा बँकांना देण्यात आलेले आहे. तर या सर्व बँकांनी मिळून पसतीस कोटी एकोन पन्नास लाख रुपये कर्ज दिले आहे. केवळ दोन पॉईंट बावीस टक्के एवढेच पीक कर्ज वाटप सध्या झाले आहे. ही सर्व आकडेवारी दिनांक २८ मे २०२१ रोजीची म्हणजेच ताजी आहे.

यावरून एकीकडे कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकरी अगोदरच त्रस्त झालेला असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज देईल का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक करणारी जिल्हा मध्यवर्ती बँक ही पीक कर्ज वाटपासाठी हतबल झालेली असून केवळ नवे जुने करणे एवढेच बँकेचे काम असणार आहे. एक कोटीचेही नवीन कर्ज जिल्हा बँक देऊ शकणार नाही. त्यामुळे प्रशासक मंडळाची देखील कसोटी लागणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात सर्व बँकांची आणि कर्जवाटप समितीची तात्काळ बैठक घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना द्याव्यात. अन्यथा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही अँड. अजित देशमुख यांनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close