आपला जिल्हा

पालकमंत्री धनंजय मुंडेंचा सातत्यपूर्ण व यशस्वी पाठपुरावा;जिल्ह्यात 15 नव्या रुग्णवाहिका दाखल

बीड  —-  बीड जिल्ह्यात कोविड परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व कोविड बाधित रुग्णांना वेळेत उपचार प्राप्त करून देण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्नशील आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत असून, बीड जिल्हा परिषदेस प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आरोग्य विभागाकडून आणखी 7 नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिका आज (शनिवारी) दाखल झाल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वीच जिल्हा आरोग्य यंत्रणेला ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांसाठी 8 नव्या रुग्णवाहिका प्राप्त झाल्या होत्या, त्यानंतर आज जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यासाठी आणखी 7 नव्या रुग्णवाहिका प्राप्त झाल्यामुळे रुग्ण वाहतुकीतील मोठा अडथळा आता दूर होणार आहे. ऑक्सिजन सह सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या या 7 रुग्णवाहिका आज जिल्ह्यात दाखल झाल्या असून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट, उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती श्री. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

परळी तालुक्यातील धर्मापुरी, धारूर तालुक्यातील रुई धारूर व मोहखेड, बीड तालुक्यातील चऱ्हाटा, आष्टी तालुक्यातील कडा, शिरूर कासार व वडवणी या सात आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे या सात रुग्णवाहिका वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी दिली आहे.

पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार राज्य आरोग्य विभागाकडे बीड जिल्ह्यासाठी एकूण 52 रूग्णवाहिकांची मागणी करण्यात आलेली आहे, त्यापैकी पहिल्याच टप्प्यात 15 रुग्णवाहिका प्राप्त झाल्याने रुग्णवाहतुक करण्यात येणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होतील, असा विश्वासही डॉ. पवार यांनी व्यक्त केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्यासाठी आवश्यक त्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत शब्द दिला होता. त्याप्रमाणे बीड जिल्ह्यासाठी मागितलेल्या रुग्णवाहिकांपैकी या टप्प्यात आतापर्यंत उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसाठी 8 व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी 7 अशा एकूण 15 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या असुन याबद्दल मा. अजितदादा पवार साहेब व आरोग्यमंत्री मा. राजेश भैय्या टोपे यांचे जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close