देश विदेश

कोरोना : पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवा — नरेंद्र मोदी; व्हिडिओ व्हायरल

दिल्ली — प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सर्वाधिक कोरोना प्रभावित नऊ राज्यांतील ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला यावेळी पॉझिटिव्ह केसेसची संख्या झपाट्याने वाढली पाहिजे. चाचण्या वेगाने झाल्या पाहिजेत, यावर भर देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. बोलण्याच्या ओघात मोदींनी केलेल्या या गंभीर चुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जे मनात सुरू असते, तेच ओठावर येते, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

 

अधिकाऱ्यांशी बोलताना प्रधानमंत्री मोदींनी झपाट्याने पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढली पाहिजे. वेगाने चाचण्यांची संख्या वाढली पाहिजे, यावर भर द्या. कोणत्याही प्रयत्नांत कसूर करू नका, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे मोदींच्या या ऑनलाइन बैठकीला काही राज्यांचे मुख्यमंत्रीही हजर होते. मोदींकडून ही चूक नकळत झालेली असली तरी ती त्यांनी नंतर दुरूस्त केली नाही की कुणी ही बाब त्यांच्या लक्षातही आणून दिली नाही.

मोदींचीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग टीव्ही चॅनेल्सवर लाइव्ह दाखवण्यात आली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून मोदींवर टिकेची झोड उठली आहे. काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करत मोदींवर टिकास्त्र सोडले आहे. प्रधानमंत्री मोदी पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढवण्याबद्दल केवळ सांगतच नाहीत तर पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारसभातील गर्दी मोजत त्यांनी आधी पॉझिटिव्ह केसेस वाढवण्याचे उदाहरणच घालून दिले आहे. तसेही जे मनात सुरू असते तेच ओठावर येते, असा सणसणीत टोला काँग्रेसने लगावला आहे. काँग्रेसखेरीज इतरांनीही हा व्हिडीओ शेअर करत मोदींवर टिकास्त्र सोडले आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि वाढलेले मृत्यूचे प्रमाण या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री आणि भाजप नेत्यांकडून ‘पॉझिटिव्हिटी’ वाढवण्याचा उच्चार वारंवार केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टिकेची झोडही उठली आहे. आता मोदींचा हा व्हिडीओ टिकाकारांसाठी नवे अस्त्र ठरले आहे.

प्रोटोकॉलचा भंग झाला नाही का?: प्रधानमंत्री मोदींची अधिकाऱ्यांसोबतची ही ऑनलाइन बैठक टीव्ही चॅनेलवर लाइव्ह दाखवण्यात आली. त्यावरूनही आम आदमी पक्षाने मोदींना सवाल करत प्रोटोकॉलची आठवण करून दिली आहे. देशातील अभूतपूर्व ऑक्सीजन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मोदींनी २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन बैठक बोलावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीचे थेट प्रसारण केल्यामुळे ही बैठक वादात सापडली होती. या थेट प्रसारणावरून मोदींनी केजरीवालांना प्रोटोकॉलची आठवण देत अडवले होते. पंरपरा आणि शिष्टाचार न पाळता या खासगी बैठकीचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांकडून अशी बाब होणे योग्य नाही. त्यांनी संयम पाळला पाहिजे, असा उपदेश मोदींनी केजरीवालांना केला होता. त्यावर भविष्यात अशी चूक होणार नाही म्हणत केजरीवालांनी माफीही मागितली होती. आता आम आदमी पक्षाने मोदींना प्रोटोकॉलची आठवण करून देत टिकास्त्र सोडले आहे.

आजच्या बैठकीतील प्रधानमंत्री मोदींचे वक्तव्य टीव्हीवर लाइव्ह दाखवण्यात आले. मागील बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लाइव्ह प्रसारणावर आक्षेप नोंदवत प्रोटोकॉल मोडल्याचे मोदींनी म्हटले होते. आजच्या बैठकीच्या प्रोटोकॉलमध्ये लाइव्ह प्रसारणाची परवानगी होती का? कोणत्या बैठकीचे लाइव्ह प्रसारण करायचे आणि कोणत्या नाही, हे कसे कळायचे? असे सवाल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले आहेत

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close