आपला जिल्हा

लोकांना मुर्खात काढायचं बंद करा अधिकाऱ्यांनो आपली जबाबदारी चोख पार पाडा; रस्त्यावर उतरण्याची नाटकं बंद करा

बीड — कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासनाची इज्जत चव्हाट्यावर मांडली गेली. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडिसिवीर अभावी अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले. प्रशासकीय व्यवस्था चोख न हाताळल्या गेल्यामुळे रुग्ण संख्या वेगाने वाढत गेली परिणामी आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली. उण्याला पुरवठा म्हणून निष्क्रिय अधिकाऱ्यांचा फौजफाटा बीडच्या माथी मारला गेला आणि दुर्दैवाचा फेरा पुन्हा एकदा जनतेच्या नशिबी आला. जिल्हा रुग्णालयाची विस्कटलेली घडी गीतेला आणखी बसवता आली नाही. माफियांची चाटू गिरी करणारा एस पी बीड ने यापूर्वी कधी पाहिला नाही. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांना ही झोडपण्याच काम केलं परिणामी आज ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अक्षरश: ठप्प झाली. कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागात होत असताना जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली. अशा स्थितीत राजकारण्यांच्या संगतीत वावरत असलेल्या जिल्हाधिकारी जगताप, अवैध धंद्यांना खतपाणी घालत ग्रामीण भागात कोरोना वाढवण्याचं काम करणारा पोलीस अधीक्षक, ग्रामीण भागातील लोकांना कोविड सेंटर बरोबरच इतर आरोग्य सेवा पोचवण्यात कुचकामी ठरलेले जिपचे सीईओ अजित कुंभार रस्त्यावर उतरून जनतेला काय दर्शवण्याच काम केलं? हे कुणालाच समजलं नाही. प्रशासनात सुसूत्रता न आणू शकलेल्या अधिकाऱ्यांनो आपली जबाबदारी चोख पार पाडली तरी बीडकरांच नशीब उजाडेल. नाटकीपणा करून स्वतःचा निष्क्रिय पणा झाकण्याच काम बंद करा लोकांना मूर्खात काढायचं आता तरी सोडून द्या जनाची नाही तर मनाची बाळगा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

कर्तव्य करा स्टंटबाजी नको
कोरोना रुग्णांची वाढती संख्या ढेपाळलेली आरोग्यव्यवस्था, कायदा-सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा. कोरोनाचे सूरू असलेले मृत्यू तांडव रेमडिसिविरचा काळाबाजार, त्याला घातले गेले खतपाणी, ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू, रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध न होणे. आरोग्य विभागातील कंत्राटी पदभरती घोटाळा हे गुरुवारी रस्त्यावर उतरलेल्या अधिकाऱ्यांचे यश आहे. खुर्चीवर बसून यंत्रणा व्यवस्थित हाताळली तरी आज सुरू असलेली दुरवस्था कमी होईल. जनता संकटातून बाहेर येईल आता ही नाटकं बंद करा. तुम्हीीी सुरु केलेला नंगा नाच विसरून जाण्यासाठी माध्यमांचे लक्ष विचलित करण्यासाठी चमकोगिरी सोडून द्या

बीडच्या दुर्दैवाने पूर्वीच्या सर्वच प्रमुख शिलेदारांची बदली झाली. नवा गडी नवं राज सुरू झालं. जिल्हाधिकारी बदलले शल्यचिकित्सक बदलले पोलीस अधीक्षकही बदलले हे सर्व अधिकारी सोयीचे आले. याच वेळी बीडचे दुर्दैव देखील उभे राहिले. यांची सत्वपरीक्षा पाहायला कोरोना ची दुसरी लाट आली. वशिलेबाजीत कर्तव्यतत्पर असलेल्या या अधिकाऱ्यांची यंत्रणा अक्षरशा पत्त्याच्या बंगल्यासारखी कोलमडून पडली. सुरुवातीपासूनच प्रामाणिक असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेलं मवाळकीच धोरण अंगलट आलं. तर बड्या नेत्याचा वरदहस्त असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गीते आपलं कोण काय वाकडं करणार ? या मस्तीत राहिले. परिणामी जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा संपूर्ण विस्कळीत झाली.रेमिडीसिवीर चा घोटाळा असो की नुकतीच झालेली कंत्राटी पदभरती असो. ढेपाळलेली आरोग्य सुविधा असो हे सर्व फलित डॉ गीतेच्या कर्तृत्वाच आहे. त्यांच्या कर्तुत्वाला जोड अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांची मिळाली आहे. या जोडीच्या जीवावर बीड जिल्ह्याच्या आरोग्याचा गाडा वासराच्या नाकात वार शिरल्यासारखा चौखूर उधळतो आहे. यात जिल्ह्यातील नागरिकांचा जीव अगदी सहज किड्या मुंग्या सारखा जात आहे.

नावातील ‘राजा’व ‘स्वामी’ शब्दांची लाज राखा
नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा अशी स्थिती बीडच्या पोलीस अधीक्षकांची देखील झाली आहे. अवैध दारू विक्री, नकली दारू, पत्त्याचे क्लब, मटका, गुटखा माफिया, वाळू माफिया यांच्यापुढे पैशासाठी हुजरेगिरी करायचं. निर्बंध कडक केलेले असतानादेखील हे धंदे राजरोस सुरू ठेवू द्यायचे. ग्रामीण भागातील वाढत्या कोरोनाला हे धंदे जबाबदार होऊ लागले आहेत.
कोरोना संकटात खायचे वांदे झालेल्या जनतेला हेल्मेटची सक्ती करायची. सर्वसामान्यां सोबतच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करायची. नसलेलं टाळकं सरकलेल्या वाळके ला जिल्हा रुग्णालयात धक्काबुक्की झाली तर सहा जणांवर गुन्हा दाखल करायचा. पण त्याच वाळके ला पाठीशी घालत चौकशी समिती स्थापन करायची. मग आंदोलनाला वैद्यकीय कर्मचारी उतरले काय? आरोग्य सेवा विस्कळीत झाली काय? यादरम्यान लोकांचे जीव गेले काय याच्याशी काहीच देणं घेणं राजा रामा स्वामी ला नाही. नावाला साजेसं एकही काम कारकीर्दीत आतापर्यंत झालं नाही थोडक्यात राजाच्या कामात ‘राम’ नाही. स्वामी पणा तर सोडून द्या हेच माफियांचे मांडलिक झाले आहेत. एस पी साहेब किमान नावात असलेल्या प्रत्येक शब्दाचा मराठीतील अर्थ समजून घ्या त्या नावाची लाज राखण्याचं काम करा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

कुंभार साहेब ग्रामीण आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात जनजागृती अपुरी पडत आहे. वैद्यकीय सेवा देखील पाहिजे त्या प्रमाणात ग्रामीण भागात उपलब्ध नाही. विलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. कोविड सेंटर नाहीत. परिणामी ग्रामीण भागात पसरत असलेला कोरूना संकट कसं दूर करायचं याची कुठलीच तयारी प्रशासनाकडे नाही. एकूणच ग्रामीण भागातील जनतेचे जीवन दैवाधीन होऊन बसले आहे. काल डॉक्टर वनवे यांना मारहाण झाल्यानंतर आष्टी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा संपूर्ण विस्कळीत झाली आहे. आता ती सुरळीत कशी करायची तोपर्यंत किती जणांचे जीव जाणार? लसीकरण कसं होणार ?या प्रश्नाचं उत्तर कोण देणार?
बुधवारी सायंकाळी डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर प्रशासनाची उरलीसुरली अब्रू ‘ना’लायक अधिकार्‍यामुळे धुळीला मिसळली गेली. ही गेलेली अब्रू वाचवण्यासाठी आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, माफीयांचे मांडलिक राजा रामास्वामी, अजित कुंभार रस्त्यावर उतरले जनतेची आम्हाला किती काळजी आहे याची टिमकी वाजवली. पण जिल्ह्यात रुग्णांच्या झालेल्या मृत्यूमध्ये तुमची जबाबदारी निश्चित जनताच करणार आहे. पुन्हा जनतेला तुमच्या आधी असलेल्या अधिकाऱ्यांची उणीव भासू लागली आहे. हे अपयश कसं झाकणार आहात. पण तुमच्या या कर्तबगारीचं उत्तर पालकमंत्र्यांना द्यावं लागणार आहे. त्यांना दीर्घकाळ राजकारण करायचं आहे किमान याची तरी जाणीव ठेवा. राजकारणी लोकांसारखं जनतेला मुर्खात काढण्यासाठी रस्त्यावर उतरत
कर्तव्यदक्षतेच अवडंबर करू नका कृती करा व बीडच्या जनतेला कोरोना संकटातून बाहेर काढा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close