महाराष्ट्र

साहेबऽऽ ती माणसं होती हो! रुग्णवाहिकेत 22 मृतदेहांची थप्पी लावायला ती जनावर नव्हती हो !

अंबाजोगाई — ती माणसं होती सन्मानाच आयुष्य जगत होती पण कोरोना महामारी आली. कोणाचा बाप कोणाचा भाऊ कोणाचा मुलगा दवाखान्यामध्ये मरु लागली. अनेकांचे भरलेले संसार क्षणात उद्ध्वस्त झाले.दवाखान्यामध्ये देखील उपचारादरम्यान अनेकांच्या नशिबी ससेहोलपट आधी. हा नियतीने मांडलेला खेळ कमी की काय म्हणून प्रशासनाने देखील मृतदेहाची विटंबना सुरू केली. कोरोनामुळे सोळा संस्कारातील एक असलेला शेवटचा संस्कार देखील व्यवस्थित झाला नाही. मेलेल्या मेंढरांसारख बावीस मृतदेह एकमेकावर रचून रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेत माणुसकीचाच अंत केला जात असल्याचे धक्कादायक चित्र स्वा रा ती रुग्णालयात पहावयास मिळाले. घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाविरोधात जनतेत प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. याच रुग्णवाहिकेतून रुग्णांची वाहतूक देखील केली जात असल्यामुळे प्रशासनाला कोरोना थांबवायचा आहे की वाढवायचा आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला की तातडीने अंत्यसंस्काराची कार्यवाही सुरू करण्यात येईल. दिवसभरातील मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्यसंस्कार करू नयेत अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
– शरद झाडके, उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई

बीड जिल्ह्यात कोरोना संकटाने उग्र रुप धारण केले असताना आरोग्य यंत्रणेवर देखील प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दररोज वेगवेगळ्या घटनांनी जिल्ह्यात खळबळ माजली जात आहे. रुग्णालयात पसरलेली अनागोंदी असो की रुग्णांचा उपचाराअभावी ऑक्सिजन अभावी होत असलेला मृत्यू असो. रेमडीसिवीर सारख्या इंजेक्शन चा काळा बाजार असो रोज नवे विषय चर्चेला येत आहेत माणुसकी कशी मरत आहे याचं चित्र डोळ्यासमोर उभे राहत आहे. वाढता मृत्यूदर रोज नव्या आकड्यांची भर टाकत आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये स्वाराती रुग्णालय व लोखंडी चे कोविड सेंटर मध्ये उपचार मिळावा यासाठी इतर जिल्ह्यातील जवळच्या तालुक्यातून रुग्ण या ठिकाणी भरती होत आहेत. उपचार व्यवस्थित न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. एकाच वेळी अनेकांवर अग्निसंस्कार करण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत रविवारी दुपारी तब्बल 22 मृतदेहांना एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. प्रशासनाने या मृतदेहांची अक्षरश: रुग्णवाहिकेत थप्पी लावली होती. महामारीच्या संकटात एकेकाळी समाजात मानाचं जीवन जगणाऱ्या या लोकांना मात्र अचानक जीवन यात्रा संपवावी लागली. नातेवाइकांकडून शेवटचा संस्कार पूर्ण होऊ शकत नाही हे जरी खरे असले तरी या संकटात प्रशासनाने आणखी भर घातली. या मृतदेहांची विटंबना करण्याची कुठलीच कसर प्रशासनाने सोडली नाही. प्रशासनाला मरत असलेली ही माणसं किडे मुंग्या आहेत की काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. याबरोबरच आणखी धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत ‌ स्वाराती रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या दोन रुग्णवाहिका मधूनच मृतदेह देखील अंत्यसंस्कारासाठी नेले जातात. याच रुग्णवाहिका मधून रुग्णांना देखील उपचारासाठी दवाखान्यामध्ये आणले जाते व त्यांना घरी सोडले जाते. या रुग्णवाहिका सॅनिटाइज देखील केल्या जात नसल्यामुळे कोरूना चा प्रसार आणखी वाढण्याची शक्यता निर्माण होते आहे. प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या दरिद्री मनोवृत्ती मुळे अनेकांचे जीव मात्र धोक्यात येत आहेत.
कोरोना च्या पहिल्या लाटेत स्वाराती रुग्णालयाला 5 रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या पण दुसरी लाट गंभीर असताना देखील व रुग्ण संख्या वाढत असताना फक्त दोनच आहेत. वाढीव रुग्णवाहिकांसाठी 17 मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले असले तरी अद्याप रुग्णवाहिका मिळाल्या नसल्याची व सॅनीटायजर मिळत नसल्याची तक्रार माझ्यापर्यंत अद्याप आली नसल्याचं ( झारीतील ) अधिष्ठाता शुक्रे नी सांगितलं.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close