आपला जिल्हा

परळीच्या थर्मलमधील ऑक्सिजन निर्मिती प्लांट होणार एसआरटी मध्ये शिफ्ट; हवेतून तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून अंबाजोगाईतील एसआरटी ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजनबाबत होणार आत्मनिर्भर

अंबाजोगाई —- कोरोनाच्या वाढत्या भीषण प्रादुर्भावामुळे बीड जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महानिर्मितीच्या वरिष्ठ यंत्रणेशी चर्चा करून परळीच्या थर्मल पावर प्लांट मधील युनिट क्र.८ चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

थर्मल पावर प्लांट मधील या ऑक्सिजन निर्मिती प्लांट द्वारे दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथील एसआरटी ग्रामीण रुग्णालयात चोवीस तासात साधारण ३०० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन तयार होईल व यामुळे येथील ऑक्सिजनचा तुटवडा कायमचा मिटणार आहे.

परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मिती साठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ साठून पाणी खराब होऊ नये यासाठी हा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात येतो. केंद्रातील युनिट क्र.६ व ७ मधील ऑक्सिजन प्लांट पूर्ववत राहतील. युनिट क्र.८ मधला प्लांट मात्र अंबाजोगाई ला शिफ्ट करण्यात येत आहे.

या प्लांटला कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री परळी थर्मल प्लांट प्रशासनाकडे प्राप्त झाली असून, एसआरटी रुग्णालयात यासाठी लागलेल्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. उद्या (शुक्रवार) ही सामग्री अंबाजोगाई येथे पाठवण्यात येईल व येत्या १० ते १५ दिवसात या प्लँट द्वारे प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात होईल अशी माहिती थर्मल केंद्राचे मुख्याधिकारी श्री. मोहन आव्हाड यांनी दिली. श्री. आव्हाड यांनी ना. मुंडे यांच्या सूचनेनुसार एसआरटी मध्ये जाऊन जागेची पाहणी केली; यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, एसआरटी चे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे आदी उपस्थित होते.

एसआरटी रुग्णालयातील ऑक्सिजन रिसिव्हर टॅंकची क्षमता एकावेळी २० हजार लिटर इतका ऑक्सिजन साठवून ठेवण्याइतकी आहे, त्यामुळे येथे आता ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

महानिर्मिती मार्फत आलेल्या या सामग्रीचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाईला शिफ्ट करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार महावितरण चे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्याधिकारी मोहन आव्हाड, उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, एसआरटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांनी वेगाने सूत्रे हलवली त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्याचे काम उद्यापासून सुरू होणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close