महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशाला पुढे नेण्यासाठी प्रेरक – धनंजय मुंडे

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह चैत्यभूमीवर करणार अभिवादन

मुंबई —- : संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांनी दिलेली शिकवण ही देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी प्रेरक आहे. आज आदरणीय डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना नमन करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे लागू असलेल्या निर्बंधांच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत साधेपणाने, घरा-घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करून साजरी करावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या (दि. १४) मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर शासकीय अभिवादन कार्यक्रम सकाळी ११.०० संपन्न होणार असून, या कार्यक्रमास राज्याचे महामहिम राज्यपाल श्री. भगतसिंह कोशारी, मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या ठिकाणी व परिसरात कुठेही गर्दी करू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

समाजातील मुख्य प्रवाहापासून उपेक्षित वंचित घटकांना ‘शिका संघटित व्हा, संघर्ष करा!’ हा मोलाचा संदेश आदरणीय बाबासाहेबांनी दिला. देशाला संविधान दिले, राज्यघटना दिली, याशिवाय रिझर्व्ह बँक, एलआयसी या सारख्या संस्थांच्या उभारणीतही बाबासाहेबांचे मोलाचे योगदान होते. समाजाच्या हितासाठी झटण्याची, झिजण्याची, राष्ट्रीय कार्यासाठी योगदान देण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातून मिळते, त्यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक नमन करतो, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close