आपला जिल्हा

धस साहेब रस्त्यावर कोणाविरुद्ध उतरता? लाॅक डाऊन हे तर तुमच्या कारकिर्दीच यश आहे !

बीड — स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी व मुठभर व्यापाऱ्यांच्या हितासाठी जनतेचे आरोग्य पणाला लावत आ. सुरेश धस लाॅक डाऊनच्या विरोधात आज रस्त्यावर उतरले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये, बाधितांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लाॅक डाऊन जाहीर केले. पण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमकुवत आहे हे अपयश दीड दिवसात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच नव्हे तर आपल्यासारख्या पंधरा पंधरा वर्ष जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्रीपद उपभोगणाऱ्या लोकप्रतिनिधींच नाही काय? तूमच्या आष्टीच्या कोविड सेंटर मध्ये रुग्णांना शौचालयाची सुविधा तुम्ही देऊ शकले नाही. हा प्रश्न माध्यमांनी उचलला त्यावेळी मार्गी लागला आता कोणत्या अधिकाराने तुम्ही जनतेचे आरोग्य पणाला लावत आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. तुमच्या राजकीय स्टंटबाजी पुढे प्रशासन नरमल असलं तरी तुमच्या कर्तबगारीतील अपयशाच लॉकडाऊन हे यश नाही काय ? जनतेचे आरोग्य मात्र धोक्यात घालत तुमच्या राजकारणाला सोन्याचा कळस चढवला जाणार आहे ? असे एक ना अनेक प्रश्न सुजान नागरिकांपुढे निर्माण झाले आहेत.
आ. सुरेश धस यांनी नेहमीच राजकारणामध्ये बंडखोर भूमिका घेतली. राज्यमंत्री असताना त्यांनी एका कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्याला राजकीय स्वार्थापोटी बदली करून जिल्हा बाहेर काढलं. या त्यांच्या राजकारणाचा परिपाक म्हणून त्यांना पुढे निवडणुकीत अपयशाला सामोरं जावं लागलं. ज्या स्व. गोपीनाथ मुंडेंना हयातीत कट्टर विरोध केला त्यांच्याच मुलीच्या वरदहस्ताने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळवले. यादरम्यान जनतेशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. मात्र यावेळी त्यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळ सूरू केला. आष्टीच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नव्हती. शौचालयाची सुविधा नव्हती महिला रुग्णांना देखील उघड्यावर शौचाला जावे लागत होते या प्रश्नावर माध्यमांनी ओरड करावी त्यानंतर तुम्हाला जाग यावी हे दुर्दैव नव्हे काय? जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हाधिकार्‍यांनी सर्व व्यापाऱ्यांना एंटीजेन टेस्ट करण्याचे आदेश जारी केले. परंतु जिल्ह्यातील अडेलतट्टू व्यापाऱ्यांनी सुरुवातीला एंटीजन टेस्टला प्रतिसाद दिला नाही. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच व्यापाऱ्यांची टेस्टसाठी एकच झुंबड उडाली. यादरम्यान सुजान जागरूक लोकहितकारी समजणारे सुरेश धस यांनी व्यापाऱ्यांना प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन करण्याची तसदी घेतली नाही. व्यापाऱ्यांच्या अडेलतट्टू भूमिकेला त्यांनी मूक संमतीच दिली. परिणामी काही स्प्रेडर बनलेल्या व्यापाऱ्यामुळे रुग्ण संख्येत भर पडली. परिणामी वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोविड सेंटर हाउसफुल झाली. जनतेचे आरोग्य धोक्यात आल्यानंतर व आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दहा दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले. सुरुवातीपासूनच प्रशासनाला सहकार्य न करण्याची भूमिका घेतलेल्या व्यापाऱ्यांनी प्रशासनावर लाॅक डाऊन नको म्हणून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मूठभर व्यापाऱ्यांच्या भूमिकेला गोरगरिबांच्या पोटापाण्याचा व जनहिताचा मुलामा देत धस साहेब तुम्ही प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरलात पण खरंच प्रामाणिकपणे 15 ते वीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जनहिताची कामं केली असती तर लोकांचा आर्थिक स्तर उंचावला गेला असता. गरीब हा गरीब राहिला नसता. दहा दिवसच काय पण महिनाभर लाॅक डाऊन झाले असते तरी समाजातला कुठलाच घटक उपाशी राहिला नसता. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरंचच पदाचा उपयोग जनहितासाठी केला असता तर आष्टी पाटोद्यातीलच नाहीतर जिल्ह्यातली रुग्णसंख्या किती जरी वाढली असती तरी आरोग्य यंत्रणा डगमगली नसती. आजच्यासारखी ती लुळीपांगळी कमकुवत राहिली नसती जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाली असती. एवढ्यााा लवकर लॉक डाउन लावण्याची जिल्हाधिकाऱ्यांवर देखील वेळ आली नसती.
आमदार साहेब तुम्ही रस्त्यावर उतरले तुमच्या या बंडखोरीमुळे प्रशासनाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नरमाईची भूमिका घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील लॉकडाऊन २९ मार्चपासून टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येईल असे जाहीर केले. असे असले हा विजय तुमचा क्षणिक असला तरी तो आपण आज पर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून जो कार्यकाळ उपभोगला त्या कारकिर्दीचा पराभव आहे हे विसरून चालणार नाही. आमदार साहेब आपण जनतेच्या आरोग्याशी खेळलेला डाव अनेकांची घरं उध्वस्त करणारा अनेकांची कुटुंब उघड्यावर आणणारा ठरणार आहे. माणूस अर्धपोटी राहिला तर फारसा फरक पडत नाही पण धडधाकट अंगाला रोग जडला तर त्या माणसाच्या जगण्याला अर्थ उरत नाही हे मात्र स्वार्थी राजकारणापुढे आपण विसरला ? पण उद्या मोदी सरकारने वाढत्या रुग्ण संख्ये मुळे महाराष्ट्र लाॅक डाऊन करा असा आदेश काढला तर तुमची लॉकडाउनच्या विरोधाची भूमिका कायम ठेवत त्यावेळी देखील असेच रस्त्यावर उतराल काय? असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close