आपला जिल्हा

जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदाराला पाच हजार रुपये दंड

बीड — जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथील भूसुधार विभागातील नायब तहसीलदार ( सामान्य – एक ) यांना माहिती अधिकारात मागितलेली माहिती न दिल्यामुळे राज्य माहिती आयोगाने पाच हजार रुपये एवढी शास्ती लादली आहे. अर्जदार विक्रम बाबुराव धुमाळ यांनी मागितलेली माहिती आयोगाच्या आदेशानंतर देखील न दिल्यामुळे आयोगाने ही कारवाई केली आहे, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

विक्रम बाबूराव धुमाळ यांना त्यांच्या शेतीशी संबंधित आष्टी तालुक्यातील माहिती, माहिती अधिकारात हवी होती. त्यामुळे त्यांनी अर्ज देऊन नायब तहसीलदारांकडे माहिती देण्याची विनंती केली होती. ही माहिती न दिल्याने त्यांनी प्रथम अपील दाखल केले होते. त्यातही त्यांना न्याय मिळाला नाही.

यानंतर विक्रम धुमाळ यांनी यांनी अँड. अजित देशमुख यांचे मार्फत राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केले होते. माहिती न दिल्याचे सिद्ध झाल्याने माहिती अधिकारी यांना कारवाई का करण्यात येऊ नये ? याबाबत खुलासा तीस दिवसात खुलासा सादर करण्याचा आदेश आयोगाने दिला होता. मात्र नायब तहसीलदार यांनी खुलासा देखील सादर केला नाही.

एकूणच या घटनाक्रमा नंतर राज्य माहिती आयुक्त, औरंगाबाद यांनी कठोर भूमिका घेत नायब तहसीलदार ( सामान्य – एक ) भूसुधार विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांना या प्रकरणी पाच हजार रुपये एवढी शास्ती लादली आहे.

संबंधित नायब तहसीलदार तथा माहिती अधिकाऱ्याकडून शास्तीची ही रक्कम वसूल करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, बीड यांच्यावर आयोगाने सोपवली आहे. तर दुसरीकडे अपिलीय अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे कारवाई केलेली नाही. त्यांचाही कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्य नसल्याची भूमिका घेऊन आयोगाने त्यांनाही याप्रकरणी ताकीद दिली आहे. भविष्यात अशा प्रकारची चूक पून्हा झाल्यास शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस शासनाकडे केली जाईल, अशी तंबीही आयोगाने प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सामान्य जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना दिली आहे.

शेतकरी जर आपल्या शेतीशी संबंधित माहिती मागत असेल, तर ती देण्याची जबाबदारी माहिती अधिकाऱ्यांची आहे. परंतु बदलत्या प्रवाहामध्ये माहिती अधिकारी माहिती देण्याचे टाळत आहेत. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. मात्र तरीही माहिती देण्याची त्यांची मानसिकता का होत नाही ? हा प्रश्न मात्र प्रत्येक वेळी अनुत्तरीत राहत आहे, असे देखील अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close