क्राईम

विवाहेच्छूक तरुणांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आष्टी — तरुणांचे विवाह न होणे ही सामाजिक समस्या निर्माण झाल्यामुळे विवाहेच्छुक तरूण व त्यांच्या कुटुंबियांना लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लग्नाचे नाटक करून फसवणूक करण्याचा धंदा मांडलेल्या टोळीचा पर्दाफाश आष्टी पोलिसांनी केला. खोटा विवाह करून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या महिलेसह एका व्यक्तीस पोलिसांनी पकडले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका तरुणाने 9 मार्च रोजी महिलेसोबत विवाह केला होता. या लग्नासाठी 80 हजार रुपये देण्यात आले. लग्न लावल्यानंतर बायकोला सोबत ठेवण्यासाठी पुन्हा 80 हजारांची मागणी करण्यात आली. त्यातील 50 हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. यासंदर्भात शिराळ येथील एका युवकाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारी मध्ये त्यांने‌ म्हटले की एका तरुणीसोबत लग्न झाले असून आता ती महिला माझ्याकडे पैशाची मागणी करत आहे. तसंच पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे.
यानंतर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सदर तक्रारीची शहानिशा करुन तक्रारदार याने सांगितल्याप्रमाणे खात्री करण्यासाठी दोन शासकीय पंचासह सापळा रचून कारवाई केली असता एक महिला आणि पुरुष यांनी तक्रारदार युवक याच्याकडून मागणी केल्या प्रमाणे रोख रक्कम 50 हजार रुपये शासकीय पंचासमक्ष स्वीकारली. यावेळी तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
आरोपींकडे चौकशी केली असता यापूर्वी याच महिला व पुरुषाने सात ते आठ युवक ज्यांचे जास्त वय किंवा लग्न झालं नसलेल्या युवकांसोबत लग्न लावून त्यांना खोट्या तक्रारी धमक्या दिल्या. तसंच त्यांच्याकडून पैसे उकळले असल्याचं निष्पन्न झालं आहे. तक्रारदार तरुणाच्या जबाबावरुन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पो. उप. नि. प्रमोद काळे, स. फौ. अरूण कांबळे, पो. ह. बन्सी जायभाये, संतोष क्षीरसागर, पो. शि. प्रदीप पिंपळे, सचिन कोळेकर, स्वाती मुंडे, शिवप्रकाश तवले, रियाज पठाण यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close