आपला जिल्हा

तलवाडा सज्जाच्या तलाठ्यास माहिती न दिल्याने पाच हजार रुपये दंड

बीड — माहिती अधिकारात माहिती न देण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. याचेच एक प्रकरण पुन्हा पुढे आले असून गेवराई तालुक्यातील तलवडा सजाच्या तलाठ्याला माहिती अधिकारात माहिती न दिल्यामुळे राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ, औरंगाबाद यांनी पाच हजार रुपये एवढ्या शास्तीची शिक्षा लादली आहे. ही शास्ती वसूल करण्याची जबाबदारी आयोगाने तहसीलदार, गेवराई यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची माहिती जनआंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.

तलवाडा येथील ज्ञानदेव विठोबा लाड यांनी सन २०१७ मध्ये माहिती अधिकारात माहिती मागितली होती. तलाठ्यांनी माहिती न दिल्यामुळे लाड यांनी प्रथम अपील तहसीलदारांकडे दाखल केले होते. त्यात देखील लाड यांना माहिती मिळाली नाही.

त्यानंतर लाड यांनी अँड. अजित देशमुख यांचे मार्फत राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे माहिती अधिकारात अपील दाखल केले होते. यामध्ये माहिती न दिल्याचे सिद्ध झाल्याने आयोगाने संबंधित तलाठ्याला शास्ती का लादण्यात येऊ नये ? याचा खुलासा सादर करण्यासाठी तीस दिवसाच्या आत व्यक्तीशा उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता.

तलाठ्यांनी या आदेशाकडे देखील दुर्लक्ष केले आणि आयोगासमोर आपली बाजू मांडली नाही. माहिती का दिली नाही, याचे कोणतेही कारण समोर आले नाही. यावरुन तलाठ्याचा कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पुरता नकारात्मक असल्याचे मत आयोगाने नोंदविले आहे.

राज्य माहिती आयोगाने तलाठी सजा तलवाडा, तालुका गेवराई, यांना या प्रकरणी अर्जदाराने मागितलेली माहिती उपलब्ध करून दिल्यामुळे पाच हजार रुपये इतकी शास्ती लादली आहे. ती वसूल करण्याची जबाबदारी तहसीलदार गेवराई यांचेवर सोपवली असून शास्ती वसूल करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल तहसीलदारांनी आयोगाकडे सादर करावा, असा आदेश दिला आहे.

माहिती अधिकारात माहिती न देण्याचा दृष्टीकोण अशा अनेक अपिलातून समोर येत असला तरी माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी आपली वर्तणूक सुधारण्यासाठी तयार नाहीत, असे बऱ्याच वेळेस दिसून येत आहे. त्यामुळे अर्जदारांची पिळवणूक होत असून कायद्यातील तरतुदीचे माहिती अधिकाऱ्यांनी पालन करावे, असे अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close