आपला जिल्हा

19 महिन्याचे वेतन रखडले, कामगारांनी पंकजा मुंडेंचा कारखाना केला बंद

परळी — 19 महिन्याचे 700 च्या वर कर्मचाऱ्यांच्याचे वेतन मिळाले नसल्याच्या कारणाने कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बुधवारी दि.10 मार्च रोजी कारखाना बंद केला. जोपर्यंत पगार मिळेत नाही तोपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. दरम्यान कामगार व अधिकारी यांच्यात बाचाबाची होऊन काही काळ तणावाचे वातावरण होते.

 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी कायम ऊसतोड मजूरांच्या हिताचे राजकारण केले. पण, तत्कालिन परिस्थितीत राष्ट्रवादी – काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी साखर कारखानदारीतही पाय ठेवले. मजूर आणि कारखानदारी यात सुवर्णमध्य साधण्याची किमयाही त्यांनी करुन दाखविली. एकेकाळी वैद्यनाथ कारखाना आशिया खंडात नावाजला गेला. परंतु, मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आलेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते. दरम्यान, आताही कर्मचाऱ्यांचे 19 महिन्यांचे वेतन थकलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक दिक्षतलू यांना निवेदन दिले.

थकीत पगार १० दिवसांत खात्यात वर्ग करा अन्यथा आम्ही कारखाना बंद करु असा इशारा दिला होता. दहा दिवस लोटूनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळ पासूनच कारखाना बंद केला असून यात वजन काटा व सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

या संपाबदल कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. कारण पंकजा मुंडे यांनी अनेक अडचणीतून हा कारखाना यंदा सुरू केला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळालाही होता. मात्र कर्मचाऱ्यांचे पगार मात्र थकीत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनी हे संपाचे हत्यार उपसले आहे.

कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी आमने सामने

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे आज दि.10 मार्च रोजी 700 वर कर्मचारी यांनी 19 महिन्याचा पगार रखडला म्हणून कारखाना बंद केला आहे. दरम्यान अधिकारी व कर्मचारी यांच्या मध्ये बाचा बाची होऊन काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान कारखाना परिसरात पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुरभे यांनी भेट दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close