क्राईम

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सिव्हील इंजिनीअरला २५ लाखांचा गंडा;  गुन्हा दाखल

बीड — सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी टिप्स देण्याचे आमिष दाखवून आणि नंतर ट्रेडिंगमध्ये झालेला नफा जमा करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी बीड शहरातील एका सिव्हील इंजिनिअरला २४ लाख २९ हजार ८३४ रुपयांचा गंडा घातला. २१ जानेवारी रोजी सुरुझालेला फसवणुकीचा हा प्रकार तब्बल दीड महिना सुरु होता. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयसिंह प्रकाशराव जगताप (रा. दत्तनगर, बीड) असे त्या फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी रात्री ८ वजता त्यांच्या मोबाईलवर झारखंड येथील जे.एस. ट्रेडस यांच्याकडून कॉल आला आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फायदा मिळविण्यासाठी त्यांच्या टिप्सच्या सुविधा घेण्यास सांगण्यात आले. त्यांच्या सतत चार दिवसांच्या पाठपुराव्यानंतर उदयसिंह जगताप गुगल पे वरून १२ हजार ५०० रुपये भरून त्या कंपनीचे सभासद झाले. त्यानंतर जगताप यांनी त्या कंपनीवर विश्वास ठेऊन लाखो रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतविले. सुरुवातीला चांगला नफा मिळाल्याने जगताप यांचा त्या कंपनीवर अधिक विश्वास बसला आणि त्यांनी गुंतवणूक वाढविली. वेळोवेळी त्या भामट्यांनी मोठा नफा झाल्याचे दाखवून ते क्लेम करण्यासाठी ठराविक टक्के रक्कम जमा करून घेतली. अशा प्रकारे जगताप यांनी एकूण २४ लाख २९ हजार ८३४ रुपये त्या कंपनीकडे जमा केले. अखेर त्या भामट्यांनी सोफ्टवेअर चार्जेसच्या नावाखाली आणखी सव्वा पाच लाख रुपये जमा करण्यास सांगितल्याने जगताप यांना संशय आला. अधिक माहितीअंती त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी शिवाजीनगर ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अनोळखी भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरिक्षक ठोंबरे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close