क्राईम

धार्मिक प्रतिष्ठेचा बुरखा पांघरत भू माफिया गौतम खटोडसह अन्य चौघांनी शेतकरी लावला देशोधडीला

बीड — भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्याची 63 गुंठे जमीन परस्पर रजिस्ट्री करून घेत शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 17-18 वर्षापासून जिल्ह्याला कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून ज्ञानाचे डोस पाजणार्‍या गौतम खटोडसह प्रवीण जैन रतनलाल नहार सह अन्य दोन जनांवर बीड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुह मे राम बगल मे छूरी या म्हणीचा प्रत्यय देत गेल्या सतरा-अठरा वर्षापासून जिल्ह्याला कीर्तन महोत्सवातून नैतिकतेचे डोस गौतम खटोड यांनी पाजले. प्रत्येक कीर्तनकाराकडून पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं वदवून घेत प्रतिष्ठित पणाचा बुरखा खटोड यांनी पांघरला. पण तो बुरखा शेवटी फाटला गेला पापाचा घडा भरला व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
बीड शहरातील सावरकर कॉलेज शेजारी शिवाजी तावरे यांची जमीन आहे. मात्र प्रवीण जैन (मौजकर) याने ही जमीन शिवाजी यांच्या भावाकडून खरेदी केल्याचे दाखवले आणि तब्बल 63 गुंठे जमिनीवर कब्जा मिळवला, त्यानंतर जैन याने ही जमीन गौतम खटोड याना विक्री केली. हे कृष्णकृत्य करत असताना गौतम खटोड व प्रवीण जैन यांनी चक्क भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून बोगस नकाशे तयार केले अन रजिस्ट्री करून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. नाहीतरी एवढी मोठी प्रतिष्ठा मिळविलेल्या व्यक्तीला विरोध तरी करणार कोण ? याबाबत 2010 मध्ये अशोक तावरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जमीन परत मिळावी म्हणून प्रयत्न केले, मात्र या भूमाफियांनी तावरे यांना दाद दिलीच नाही. अशोक तावरे यांनी याबाबतची सर्व कागदपत्रे गोळा केली असता भूमिअभिलेखच्या दस्तऐवजात ही जमीन अजूनही शिवाजी तावरे यांच्याच मालकीची असल्याचे दिसून आले. त्यानंतर अशोक तावरे यांनी 2020 मध्ये शहर पोलीसात या प्रकरणी संबंधित भूमाफिया विरुद्ध तक्रार दिली, मात्र पोलिसांनी खटोड सारख्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून
लक्ष्मी दर्शन झाल्याने तावरे यांची तक्रार दाखल करून घेतलीच नाही.

एस.पी. राजा रामा स्वामींनी न्याय केला

अखेर नूतन पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी या प्रकरणात न्याय्य भूमिका घेत भूमाफिया असलेल्या गौतम खटोड च्या फसव्या प्रतिष्ठेला न जुमानता गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशामुळे धार्मिक प्रतिष्ठेचा बुरखा पांघरलेल्या खटोड चा बुरखा फाडला गेला आहे. एस पी नी घेतलेल्या न्याय भूमिकेमुळे त्यांचे जनतेतून आभार व्यक्त केले जात आहेत. एसपींच्या आदेशानंतर सोमवारी प्रवीण जैन, गौतम खटोड, रतनलाल नहार, रामराव तावरे तसेच प्रवीण मौजकर या पाच जणांविरोधात कलम 420 अन्वये बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close