आपला जिल्हा

सतरा नवरे एकालाही न आवरे, डॉ. गीते तीन महिन्यांत कोविड वार्डाकडे फिरकलेच नाहीत

बीड — अधिकारी कर्मचारी कमी असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा पदर फाटकाच आहे. यावरही जिल्ह्यात येणारा अधिकारी चांगला असावा त्याने जनतेच्या अडीअडचणी काळजीने सोडवाव्या यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा भर असतो पण दुर्दैवाने उलटच घडत असल्याचं पाहायला मिळतंय. जिल्हा रुग्णालयाचा कारभार आणखी सुधारावा जनतेला आरोग्य सुविधा व्यवस्थित मिळाव्या या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते यांना जिल्ह्यात आणलं गेलं पण पदभार घेतल्यानंतर गेल्या अडीच तीन महिन्याच्या कालावधीत डॉ. गीते एकदाही कोविड वार्डाकडे फिरकले देखील नाही. त्यांच्यातील बेफिकीरी चा परिचय सोमवारी त्यांनी दिला. त्यामुळे कोरोना च्या दुसऱ्या लाटेत बीडकरांच आरोग्याचं काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हाधिकारी साहेब, वेळीच सावरा गितेंच्या रामभरोसे कारभाराला आवरा नाहीतर बीडकरांचा जिव कोरोना लाटेमुळे व गीतेच्या हलगर्जीपणामुळे धोक्यात सापडला तर नवल नाही. शेवटी याच उत्तर आपल्यालाच द्यायचंय.जिल्ह्यात आपण यापूर्वी काम केलेलं असल्याने सगळाच अभ्यास आपल्याला आहे.केवळ गितेंच्या बेफिकीरीचा परिणाम आपली कारकीर्द अयशस्वी होऊ नये याची काळजी घ्या

राज्यात कोरोणाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही शहरांमधून लाॅक डाऊन करावे लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला मी जबाबदार मोहीम राबवत आपली परिवाराची व समाजाची नियमांचे पालन करून काळजी घेण्याच आवाहन केला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेबरोबरच प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. पण बीडमध्ये कोरोना च्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच विपरीत घडताना दिसून येत आहे.सोमवारी फ्रन्टलाइन वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्याचं काम जिल्हा रुग्णालयात सुरू होतं. यावेळी दुसऱ्यांना नियम शिकवणारे कर्मचारी सोशल डिस्टंसिंग च्या आईचा घो करत गर्दी करून रांगेत उभे होते. याउपर कळस म्हणजे बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन केले जावे यासाठी कुठलीही सोय केली नाही. एकूणच जिल्हा रुग्णालयाला काल बाजाराचं स्वरूप प्राप्त झालं होतं. बीड जिल्हा प्रशासनाला कर्मचारी अधिकारी कमतरतेची किड लागलेली आहे एकूणच प्रशासनाचा पदर फाटकाच आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात येणारा अधिकारी चांगला असावा त्याने सक्षम पणे काम करत जनतेला व्यवस्थित सेवा प्रदान करावी यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चांगले अधिकारी जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने जिल्ह्याच्या फाटक्या पदरात गीतेंच्या रुपाने ‘निखाराच’ पडला. त्यांच्या बेफिकीरी चे वेगवेगळे किस्से बाहेर पडू लागले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा घेतल्या पासून कोविड वार्डामध्ये आलेल्या रुग्णांना व्यवस्थित आरोग्य सुविधा मिळते आहे की नाही ‌ त्यांना दिला जाणारा आहार चांगल्या दर्जाचा आहे की नाही याकडे पाहण्याची फुरसत डॉक्टर सूर्यकांत गीते यांना आतापर्यंत मिळालीच नाही ते या वार्डाकडे कधी फिरकलेच नाहीत. लांबूनच आढावा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला. पण दुरून डोंगर सुद्धा साजरा दिसतो ही बाब ते विसरले. खरोखरच देव ना करो पण जर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर रुग्णांचे हाल काय होतील. त्यांना आरोग्य सुविधा योग्य आहार मिळेल काय असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एकूणच जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा ढासळली तर राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे उत्तर काय देणार जनतेला देखील काय सांगणार असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close