आपला जिल्हा

बोगस एन.ए. वर बोगस शिक्का दाखवून आता खरेदीखते नोंदवणे चालू.

        • जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे– अँड. अजित देशमुख

बीड —  बीड जिल्ह्यात बोगस अकृषी आदेश आणि बोगस गुंठेवारी आधारे करोडो रुपयांचा महसूल बुडवून खरेदीखते नोंदली जात होती. ती रोखली तर आता तहसील मधून आणलेल्या दुसऱ्याच्याच नकलेच्या झेरॉक्स लावून बोगसगिरी दुप्पट क्षमतेने वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अधिकारी यात सामील आहेत. कोणत्याही परिस्थितीत बोगसगिरी चालू दिली जाणार नाही. अन्यथा रजिस्ट्री ऑफिस मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये घालावे लागेल, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

तहसील कार्यालयातून जो एन.ए. खरा आहे त्याची एक प्रत कोणीतरी आणली आहे. त्याच्या मागच्या पानावर प्रमाणीत प्रत असा शिक्का मारलेला आहे. त्या शिक्याचा गैर वापर केला जात आहे. विशेष म्हणजे या बोगस आदेशावरून तलाठी खाजगीरित्या महसूल खिशात घालून कर भरून घेत आहेत. कोणता अकृषी आदेश खरा आणि कोणता खोटा हे तलाठ्याला माहीत असते. मात्र काळा बाजार वाढविणाऱ्या यातील काही प्रवृत्ती जेलमध्ये घातल्याशिवाय ही यंत्रणा सुधारणार नाही.

बीड शहरातील एकशे चाळीस अकृषी आदेश तपासल्यानंतर त्यातील सत्त्याहत्तर आदेश बोगस निघाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसिलदार आणि उप विभागीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी दिलेले अकृषी आदेश कोणाला दिले, त्याचे जावक नंबर, तारीख, नाव, क्षेत्रफळ इत्यादी सर्व माहिती मागविण्यात आलेली आहे. जवळपास सर्व तहसीलमध्ये ही माहिती तयार आहे. अशीच बोगसगिरीची परिस्थिती अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी सह अन्य तालुक्यांमध्ये आहे. मात्र आता हे एकत्रीकरण पूर्ण करून यादी जाहीर व्हायला हवी.

बीड जिल्ह्यात लबाडी करणारी एक यंत्रणा सर्व समावेशक रीतीने तयार आहे. ही यंत्रणा प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करते. यातून सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडतो. आणि हा महसूल बुडू नये, यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहे. वेग वेगळ्या सुधारणा आमच्या मुळे झाल्या आहेत.

जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई आणि माजलगाव या ठिकाणच्या बोगस अकृषी आदेशाच्या तपासणीसाठी अप्पर जिल्हाधिकारी, बीड आणि अंबाजोगाई यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नियुक्त केलेल्या आहेत. या समित्यांचे कामही प्रगतिपथावर आहे. जिल्हाधिकारी जगताप यांनी बोगसगिरी करणारी कोणतीही यंत्रणा पुन्हा शासनाला फसवणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा काळ्या बाजाराचा राडा पुन्हा सुरू होईल. हे लोक शासनाचा महसूल तर बुडावतातच. मात्र त्याचबरोबर प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी घेणाऱ्या लोकांवर प्रचंड अन्याय करतात. खोटी कागदपत्रे जोडून फसवतात. त्यामुळे यांना रोखणे ही काळाची गरज आहे. लोकांना फसवणाऱ्या अधिकाऱ्यांना पापाची फेड करावीच लागेल.

दलाली करणारी यंत्रणा आणि दुय्यम निबंधक कार्यालयात काम करणारी आतली आणि बाहेरची यंत्रणा आता बोगस आदेशावर पुन्हा खरेदी खत नोंदवणे चालू करू, अशी चर्चा करताना दिसत आहेत. मात्र आता बोगसगिरी करू नका. केल्यास अधिकाऱ्यांसह दलालांवर प्रकरण शेकेल. प्रचंड प्रमाणात बोगसगिरी झालेली आहे, हे तुम्हाला माहीत असताना आता लबाडी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही अँड. देशमुख यांनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close