क्राईम

मुलगा होत नाही म्हणून नराधम पतीने केला पत्नीचा खून

बीड — कुटुंब नियोजन केेलेल्या पत्नीला आता मुल होणार नाही, शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागणार या संतापातून मुलाचा हव्यास करणार्‍या पतीने स्वत:च्या पत्नीस बांधुन बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे रक्तस्त्राव होवून रूग्णालयात घेवून जात असताना त्या दुर्दैवी पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेने संताप व्यक्त होत असून मुलाचा हव्यास करणार्‍या नवर्‍याविरोधात बीड ग्रामीण पोलीसात शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला पोलीसांनी अटक केली असून सदरची घटना ही बीड तालुक्यातील औरंगपुरा शिवारातील कल्याण डरफे यांच्या शेतात घडली.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की, दहा वर्षापुर्वी पैठण येथील राधा हिचा विवाह गेवराईत तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेड्डे याच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन आपत्य झाले. मात्र दुर्दैवाने आठ वर्षाच्या मुलाचा आजाराने दोन वर्षापुर्वी मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याने आपल्या वंशाला दिवा नाही म्हणून आता दुसरी बायको करावी लागेल असा तगादा महादेव हा आपली पत्नी राधा हिच्याकडे लावत होता. तिला आता लेकरू होणार नाही असे म्हणून रोज तिला मारहाण करायचा. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने राधालाही मुलबाळ होणार नव्हते हे तिला माहित होते. पती सतत तिला शिवीगाळ करत ऑपरेशन करूनही तुला लेकरू झालं नाही तर मी काय करू? पैसे ही जातेल म्हणून आता मी दुसरं लग्न करतो असे म्हणून तिच्यावर ओरडू लागला. घरी आल्यानंतरही राधाला त्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार तिने तिच्या माहेरी सांगितला. त्यावेळेस त्यांनी दोन-चार दिवसात आम्ही पैसे देतो असे म्हणून तिची समजूत काढली व तुझ्या सासरी येवून जावयालाही समजून सांगु असे म्हणाले.

शुक्रवारी रात्री मुलाच्या हव्यासापोटी आरोपी महादेव आसाराम रेड्डे याने त्याची पत्नी राधा हिचे हातपाय बांधुन पहाटे तीन वाजेपर्यंत लाकडी दांड्याने मारहाण केली. नडग्या फोडल्या, संपुर्ण अंगावर लाकडाने मुक्कामार दिला आणि पहाटेच घरातून निघून गेला. सकाळी ९ वाजता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राधाने शेजारच्या महिलेला हाक मारून मला सोडा आणि दवाखान्यात घेवून जा अशी विनंती केली. त्यानंतर शेजारच्या महिलेने ते राहत असलेल्या शेत मालकाला फोन केला, शेत मालक तेथे आल्यानंतर तिला जवळच्या निपाणी जवळका येथील दवाखान्यात घेवून जात असतांनाच तिने वाटेतच तिने प्राण सोडले. या प्रकरणाची माहिती तिच्या माहेरच्या लोकांना मिळाल्यानंतर त्यांनी गेवराई पोलीसांना घेवून घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष साबळे, एपीआय योगेश उबाळे, राजपूत यांच्यासह इतर कर्मचार्‍यानंी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी महादेव रेड्डे याच्या विरोधात मयत राधाचा भाऊ सुनिल राधाकिसन बांगडे रा.चित्तेगाव ता.पैठण यांच्या फिर्यादीवरून ३०२ चा गुन्हा दाखल झाला आहे. रात्रीच आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close