आपला जिल्हा

गहिनीनाथ गडावरील भक्तीचा धागा सर्वांना बांधून ठेवणारा – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

पाटोदा —- बीड जिल्ह्याचे भाग्य मोठे आहे. या जिल्ह्यात जी धार्मिक संस्थाने आहेत त्या संस्थान मार्फत भक्तीचा ठेवा जपला जातो. गहिनीनाथ गडावरील भक्तीचा धागा हा सर्वांना बांधून ठेवणारा आहे. जी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते ती आम्ही करत असतो गडाचा विकास हा कुणाच्या वैयक्तिक विषयाचा नसतो हा श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असतो असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ट्रस्ट संस्थान सद्गुरू वामनभाऊ महाराज यांचा 45 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता या वेळी ह.भ.प. आसाराम बडे आळंदीकर महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे, माजी पालक मंत्री पंकजा ताई मुंडे, खासदार प्रीतम ताई मुंडे, आ बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मठाधिपती महंत विठ्ठल महाराज म्हणाले की सद्गुरू वामनभाऊ यांचा मोठा शिष्य वर्ग असून दरवर्षी या ठिकाणी जनसागर लोटलेला असतो. अंतकरणातून स्मरण केले तर आजचे मरण उद्या वर जाते. यावर्षी महाप्रसाद म्हणून पॉकेट मधून प्रसाद रुपी आशीर्वाद सर्वांना दिला जात आहे. समाजाने हात पसरण्याची वृत्ती आता सोडली पाहिजे इथे येणारे धार्मिक वृत्तीने येत असतात मात्र राजकीय व्यासपीठावर येताना मात्र वृत्ती बदलते. या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मोठे काम केले आहे. तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गडाकडे येणारे रस्ते आणि सुविधा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांनीच उपलब्ध करून दिले आहेत. माजी पालक मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देखील 35 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामध्ये अडीच कोटी रुपयांचे काम झाले असून उर्वरित रक्कम मिळणार आहे. संत वामनभाऊ यांचा आणि गहिनीनाथांचा संवाद कसा झाला याबाबत विठ्ठल महाराज यांनी उपस्थित भक्तांना माहिती दिली.

यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की कोरोनाच्या काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी घेत असताना आज लाखोंचा जनसागर याठिकाणी उपस्थित आहे. चुंबक लोखंडाला आकर्षित करून घेते तसा हा भक्तांचा लोंढा भक्तीकडे श्रद्धेकडे या ठिकाणी आलेला आहे. गडावरील भक्तीचा धागा हा सर्वांना बांधून ठेवणारा आहे. जी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती आम्ही केली आहे, गडाचा विकास हा कुणाचा वैयक्तिक विषय नाही हा श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संत वामन भाऊंच्या संस्कार आणि शिस्त यामुळे नवशक्ती निर्माण झाली आहे. भक्तीचा वापर समाजाला जोडण्यासाठी होतो ही फार मोठी गोष्ट आहे. संत वामनभाऊ यांच्या कृपेने बीड जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा, वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वारसा चालवत असताना समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बीड जिल्हा अध्यात्माच्या श्रीमंतीने नटलेला असून परंपरेने वारी करणारा भक्त बीड जिल्ह्यात येणार्‍या पिढ्यांसाठी भक्ती आणि शक्ती यांचे दर्शन घडवून आणणारा आहे. मनातले प्रदूषण दूर करण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण महत्वाचे आहे. भाव आणि भक्तीचे सुरेल व सुरेख मिश्रण बीड जिल्ह्यात पाहायला मिळते असे सांगून त्यांनी उपस्थित भाविकांना संबोधित केले यावेळी बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातून लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close