आपला जिल्हा

…तर पुढील अनेक वर्ष चांगल्या कामासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील – पंकजाताईंच्या शुभेच्छांना धनंजय मुंडे यांचे उत्तर

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी रखडलेले २३ कोटी व वाढीव ५ कोटी निधी देणार ; जिल्हयाचे मागासलेपण दूर करणार – मुंडेंची गडावरून घोषणा

संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय मुंडे यांच्या हस्ते पारंपरिक महापूजा संपन्न


गहिनीनाथगड/पाटोदा —–  माजी पालकमंत्री यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन जिल्ह्यात येत्या चार वर्षात विकासाचे असे काम करू की पुढील अनेक वर्ष त्यांना आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असे विधान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले. संत वामनभाऊ महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मागील सरकारच्या काळात ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गहिनीनाथगडास मागील सरकारच्या काळात विविध विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात फक्त दोन कोटी रुपये प्राप्त असल्याची कबुली माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिली. रखडलेले २३ कोटी रुपये व अधिकचे ५ कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी येत्या दोन वर्षात उपलब्ध करून देऊ असा शब्दही यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकून सर्वाधिक ऊस पिकवणारा जिल्हा अशी ओळख निर्माण करून देणे आणि जिल्ह्याची मागासलेपण दूर करणे हा आपला निर्धार असल्याचे धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवले.

यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री, खा. प्रीतमताई मुंडे, आ. बाळासाहेब काका आजबे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बजरंगबप्पा सोनवणे, मा.आ. साहेबराव दरेकर, मा.आ. भीमराव धोंडे, सतिष शिंदे, जयदत्त धस, शिवभूषण जाधव, आप्पासाहेब राख, अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल सानप, विश्वास नागरगोजे, शिवाजीराव नाकाडे, सतिश बडे यांसह गडाचे वारकरी – टाळकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत वामनभाऊ यांच्या जीवन चरित्रावर आधारित ओवी स्वरूपातील ग्रंथाचे यावेळी ना. मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथाचे लेखन संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज ह.भ.प. प्रमोद दिगंबर महाराज यांनी केले असल्याची माहिती विठ्ठल महाराजांनी दिली.

संत वामनभाऊ यांचे आपण निस्सीम भक्त असून, राज्याचा मंत्री म्हणून नाही तर एक भक्त म्हणून या गडावर आलो आहे व भविष्यातही अखंडपणे येत राहीन असे म्हणताना वामनभाऊ महाराजांचे आपल्याला आशीर्वाद असल्याचेही म्हटले.

संत वामनभाऊ यांनी समाजाला दिलेली शिकवण आपण आत्मसात करावी, यासाठी चांगल्या व निस्वार्थी मनाने भक्ती करावी असेही ना. मुंडे म्हणाले. गेल्या १७ वर्षांपासून आपण गडावर पुण्यतिथीनिमित्त आयोजित महापूजेस येत असून, महापूजेचा हा मान आपल्यासाठी कोणत्याही पदापेक्षा खूप मोठा आहे, अशा शब्दात मुंडेंनी आपल्या भक्तीभावना प्रकट केल्या.

..या आशीर्वादापुढे कोणतेही संकट तोकडे – ना. मुंडे

वामनभाऊंच्या प्रति आपली श्रद्धा आज इथपर्यंत, या पदापर्यंत मला घेऊन आली, गडाचा भक्त म्हणून मी नेहमीच कृतज्ञ राहीन, जिल्ह्यातील जनतेचे प्रेम हा माझ्यासाठी भाऊंचा – देवाचा आशीर्वाद असून, या आशीर्वादापुढे जगातील कोणतेही संकट तोकडे आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे, ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या हस्ते महापूजा

तत्पूर्वी सकाळी ७.३० वा.पासून संत वामनभाऊ यांच्या समाधी मंदिरात पुण्यतिथीनिमित्त पारंपरिक महापूजा ना. धनंजय मुंडे व गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर समाधीचा महाभिषेक व महाआरती करण्यात आली, यावेळी आ. बाळासाहेब आजबे, बजरंगबप्पा सोनवणे, सतिश शिंदे आदींची उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close