क्राईम

करणीतून बालकाचा केला खून, मारेकरी दाम्पत्य 24 तासात जेरबंद

बीड — तालुक्यातील नेकनुर जवळील रत्नागिरी येथे शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी आढळून आला होता. याप्रकरणी कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. उत्तरीय तपासणी मध्ये देखील मुलाचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर नेकनूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करणीच्या संशयातून या मुलाचा खून केला असल्याचे उघडकीस आले या प्रकरणी दोन आरोपी पती-पत्नीला पोलिसांनी पकडले आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, नेकनूर पासून जवळ असलेल्या रत्नागिरी येथील शुभम (उर्फ राज) सपकाळ या ६ वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळून आला होता. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. शुभमच्या कुटुंबियांनी या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.बुधवारी रात्री उशिरा उत्तरीय तपासणी अहवालातून त्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने करत सपकाळ यांच्या भावकीतील रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याला ताब्यात घेतले. यावेळी या दोघांनीही जुन्या भांडणातून ‘त्या’ बालकाचा खून केला असल्याचे सांगितले. ‘आमच्या म्हैशी ला करणी करून तिला ठार मारण्यात आले होते आणि त्याचा बदला म्हणून आम्ही या मुलाला ठार मारले असल्याचे’ त्यांनी पोलिसांना सांगितले. रोहिदास सपकाळ यांचे घर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असून बुधवारी शुभम शाळेला आला असता त्याला उचलून रोहिदास यांनी स्वत:च्या घरामध्ये नेले आणि तिथेच त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आणून टाकला असल्याची कबुली पोलिसांना दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close