महाराष्ट्र

बीड पाठोपाठ नगर जिल्ह्यातही धनंजय मुंडे यांचे अभूतपूर्व स्वागत, जेसीबीने उधळली फुले!

नेवासा (वंजारवाडी) येथे डॉ. तात्याराव लहाने यांचा मुंडेंच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव

 

वाडी’चे नाव बदलून संतांची कर्मभूमी शोभेल असे नाव गावाला द्या – धनंजय मुंडेंचे गावकऱ्यांना आवाहन!

आयुष्यात मी कमावलेले पुण्य धनंजय मुंडेंना मिळो – डॉ. तात्याराव लहाने

नेवासा/वंजारवाडी —- : पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या सत्कारासाठी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे बीड पाठोपाठ नगरकरांनी देखील अभूतपूर्व स्वागत केले. अहमदनगर पासून प्रत्येक गावात पक्ष कार्यकर्ते – समर्थकांनी ठिकठिकाणी आपल्या लाडक्या नेत्याचे हारा-फुलांनी उत्साहात स्वागत केले, अगदी काही ठिकाणी तर जेसीबीतून फुले उधळत, वाजत गाजत क्रेनने हार घालून मुंडेंचे स्वागत करण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ – संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्या वतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाअंतर्गत धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. लहाने यांना समहाभूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

लाखो लोकांना दृष्टिदाते म्हणून जगविख्यात ख्याती प्राप्त संततुल्य डॉ. तात्याराव लहाने यांना माझ्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करणे ही खरंतर माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कायम गोरगरीब लोकांची सेवा करण्यास प्राधान्य देतात, त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे, त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो अशा शब्दात डॉ. तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.

सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत नुकताच घेण्यात आलेल्या निर्णयांतर्गत गाव-वाड्या वस्त्यांना जातीवाचक नावे नसावीत, ती बदलून त्याऐवजी, संतांची, महापुरुषांची किंवा समता दर्शक नावे देण्यात यावीत, या निर्णयाचा दाखल देत ना. धनंजय मुंडे यांनी वंजारवाडी गावचे नाव येणाऱ्या ग्रामसभेत ठराव घेऊन बदलावे व संत-महापुरुषांचे एखादे नाव गावाने ठराव घेऊन ठरवावे असे आवाहनही केले आहे. या कार्यक्रमास ना. मुंडे यांच्यासह पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, माजी खा. तुकाराम गडाख पाटील, उदयनराजे गडाख पाटील ह.भ.प. विष्णू केंद्रे महाराज, ह.भ.प. तांदळे महाराज, वंजारवाडीचे सरपंच महादेव दराडे यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात धनंजय मुंडे, डॉ. लहाने यांसह आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

डॉ. तात्याराव लहाने यांचे कार्य महान असून त्यापुढे पद्मश्री पुरस्कार सुद्धा छोटा वाटतो, असे म्हणतच ना. मुंडेंनी डॉ. लहाने यांच्याबाबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. डॉ. लहाने हे आमच्या परळीचे जावई असल्याने व माझे नातेवाईक म्हणून कायमच ते आदरस्थानी आहेत, असेही मुंडे म्हणाले.

मागील सरकारच्या काळात त्रास झाला तेव्हा धनंजय पाठीशी होते – डॉ. लहाने

धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासुन ओळखतो, मागील सरकारच्या सत्ता काळात मला काही अडचणी आल्या, मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवा व्रत स्वीकारलेले आहे आणि याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली, मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन, असेही डॉ. लहाने यावेळी बोलताना म्हणाले.

धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त – ह.भ.प. इंदुरीकर महाराज

दरम्यान धनंजय मुंडे यांनी संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांचे येथील मंदिरात दर्शन घेऊन भागवनबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. त्यावेळी प्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन नुकतेच संपले होते. धनंजय मुंडे यांनी श्रोत्यांच्या गर्दीत जागा घेतली, तोच संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनु भाऊ आहेत. धनुभाऊंना संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांचे आशीर्वाद प्राप्त आहेत असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

शनी शिंगणापूर येथेही घेतले दर्शन

दरम्यान धनंजय मुंडे यांनी शनी देवाचे शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे जाऊन मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. यावेळी डॉ. तात्याराव लहाने, उदयनराजे गडाख पाटील आदी उपस्थित होते. शनी मंदीर देवस्थानच्या वतीने यावेळी ना. मुंडे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close