देश विदेश

लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱा दीप सिध्दू भाजपचा कार्यकर्ता,हिंसेला दिली चिथावणी

नवी दिल्ली —- तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर निशाण साहिब फडकवल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांना ‘दहशतवादी’ आणि खलिस्तानी ठरवले जात आहे. मात्र लाल किल्ल्यावर हा झेंडा फडकवायला लावणारा पंजाबी अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्धू हा भाजपशी संबंधित असून लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये भाजप बळकट करण्यासाठी त्याने धडाकेबाज प्रचारही केला आहे. विशेष म्हणजे गुरदासपूरचे खासदार अभिनेता सन्नी देओल यांचा तो इलेक्शन एजंटही होता.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान मंगळवारी दुपारी प्रजासत्ताक दिनी ‘राज करेगा खालसा’च्या घोषणांच्या गजरात अभिनेता ते कार्यकर्ता असा प्रवास करणाऱ्या दीप सिद्धूने लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फडकवण्यासाठी एका व्यक्तीच्या हातात ‘केसरी’ झेंडा दिला आणि त्या व्यक्तीने तो झेंडा तटबंदीवर फडकवला. मंगळवारी अतिरेकी घटकांनी ट्रॅक्टर परेड कशी हायजॅक केली आणि या अराजकात दीप सिद्धूची कशी भूमिका होती, याचा गौप्यस्फोट ‘द ट्रिब्यून’ने केला आहे.

दीप सिद्धूला तीन कृषी कायद्या विरोधातील आंदोलनापासून दूर ठेवण्याचा शेतकरी संघटनांनी वारंवार प्रयत्न केला, तरीही दीप सिद्धूने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनातून बाजूला फेकला गेलेला दीप सिद्धू नियोजित ट्रॅक्टर परेडच्या एक दिवस आगोदर अचानक या आंदोलनात उगवला. दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवरच ट्रॅक्टर परेड काढण्याचा आग्रह धरत त्यासाठी त्याने जोरदार मोर्चेबांधणीही केली.

आऊटर रिंग रोडवरच ट्रॅक्टर परेड काढण्याची शेतकरी आंदोलकांची मूळ योजना होती. परंतु संयुक्त किसान मोर्चा आणि पोलिसांशी झालेल्या चर्चेदरम्यान ही योजना बदलण्यात आली होती. मात्र दीप सिद्धूच्या मोर्चेबांधणीमुळे किसान मजदूर संघर्ष समितीने आऊटर रिंग रोडवरच ट्रॅक्टर परेड काढू, अशी भूमिका घेतली. ३२ शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाचा भाग असलेल्या भारतीय किसान युनियनने (क्रांतीकारी) ट्रॅक्टर परेडसाठी सहमतीने ठरवलेल्या नव्या मार्गाचे पालन न करण्याची संधी दीप सिद्धूला दिली.

सोमवारी सायंकाळी दीप सिद्धूने माजी गँगस्टर आणि विद्यमान सामाजिक कार्यकर्ता लाखा सिधाना याच्या सोबत सिंघू सीमेवरील आंदोलनाच्या मुख्य मंचाचा ताबा घेतला आणि आम्ही दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेड काढणार आहोत, अशी घोषणा त्याने केली.

संयुक्त किसान मोर्चा आणि दिल्ली पोलिसांनी परस्पर ठरवलेल्या मार्गांऐवजी ट्रॅक्टर परेड कशी काढायची याची योजना मंगळवारी सकाळीच त्यांच्याकडे तयार होती. शेतकरी संघटनांच्या अधिकृत ट्रॅक्टर परेड आधीच त्यांनी ट्रॅक्टर परेडला सुरूवात केली. मध्य दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचे ‘गुंड’ मोठ्या संख्येने तैनात केलेले होते. तेथून त्यांनी अन्य ट्रॅक्टर्सनाही लाल किल्ल्याच्या दिशेने वळवले. एकवेळा शेतकरी संघटनांच्या स्वयंसेवकांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला, मात्र दीप सिद्धू आणि लाखा सिधाना गटाने त्यांची डाळ शिजू दिली नाही.

ही आकस्मिकता शेतकरी संघटनांच्या फारपूर्वीच लक्षात आलेली होती. सुमारे महिनाभरापूर्वी ३२ शेतकरी संघटनांच्या बैठकीत एका शेतकरी नेत्याने दीप सिद्धू आणि लाखा सिधाना यांना या शेतकरी आंदोलनाचे शत्रू संबोधले होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला जातीय वळण देण्याचा हे दोघे जण आंदोलन सुरू झाल्यापासूनच प्रयत्न करत होते आणि याचीच चिंता ३२ शेतकरी संघटनांना सतावत होती.

दीप सिद्धूने या आंदोलनाला ‘शंभू मोर्चा’ संबोधले होते आणि काही खलिस्तान समर्थक चॅनेल्सवर लाइव्ह स्ट्रिमिंगचे पाठबळ मिळायला सुरूवात झाली होती. दीप सिद्धू शेतकरी संघटनांच्या डाव्या नेतृत्वावर वारंवार टीका करत होता. तो यहुदीचे उदाहरण द्यायचा आणि लोकांना ‘शीख जन्मभूमीसाठी’ लढण्यासाठी प्रेरित करायचा.

‘ उजव्या हिंदूं’चे समर्थन करणारा दीप सिद्धू अचानक ‘ उजव्या शीख गटा’चा पाठीराखा कसा बनला, असे सवाल आता उपस्थित केले जात आहे. त्याचे त्याने स्वतःच स्पष्टीकरणही दिले आहे. नक्षलवाद सोडून खलिस्तान समर्थक बनलेल्या अजमेरसिंगाने शीखांच्या इतिहासावर लिहिले पुस्तक वाचून आपला दृष्टिकोन बदलला, असे दीप सिद्धू सांगतो. दीप सिद्धू हा अजमेर सिंगचा ‘आघाडीचा चेहरा’ असल्याचा आरोप शेतकरी संघटना उघडपणे करतात.

शेतकरी संघटनांनी दीप सिद्धूला या आंदोलनात तिळमात्र स्थान दिले नाही, २६-२७ नोव्हेंबरनंतर शेतकरी जेव्हा दिल्लीच्या नजीक येऊन धडकले तेव्हा दीप सिद्धूने ‘कम्युनिस्ट’ तुमच्या मुलांचा तोफेच्या दारूगोळ्यासारखा वापर करून घेऊ इच्छित आहेत, त्यामुळे परत जा, असे दीप सिद्धूने एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत सांगितले होते. मात्र त्यानंतर लगेचच त्याने आपले हे विधान मागे घेतले.

दोन आठवड्यांपूर्वी दीप सिद्धूने शेतकरी संघटनांना संघटनांना एक पत्र लिहिले होते आणि तुमच्या आंदोलनाचा एक भाग होण्याची इच्छा असल्याचे त्यात नमूद केले होते. मात्र त्याची ही विनंती शेतकरी संघटनांनी धुडकावून लावली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close