आपला जिल्हा

शिरूर तालुक्यात पुन्हा पाच मोरांचा मृत्यू;जनतेत भिती

बीड– दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात मोरांचा मृत्यू सत्र सुरू असून ते थांबता थांबत नाही. शुक्रवारी सकाळी शिरूर कासार तालुक्यातील लोणी शिवारात मृतावस्थेत पाच मोर आढळून आले होते. शनिवारी दुपारी चार वाजता पुन्हा लोणी शिवारातच एका ज्वारीच्या शेतात 5 मोर मृतावस्थेत आढळून असल्याने नागरिकांमध्ये बर्ड फ्लूच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन दिवस मोरांचे मृत्यू होत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. असे असताना देखील बीड जिल्हा प्रशासन मोरांचे मृत्यू रोखण्यासाठी ठोस अशी पावले उचलत नसल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शिरूर कासार तालुक्‍यात लोणी-वारणी शिवारातील मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यात बर्ड फ्लू ची साथ असल्याने अनेक ठिकाणी पक्षांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे मागील दोन दिवसात बीड जिल्ह्यात 10 मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी चार वाजता पुन्हा लोणी शिवारात एका ज्वारीच्या शेतामध्ये पाच मोर मृतावस्थेत आढळून आल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोरांचे होत असलेल्या मृत्यू संदर्भाने जिल्हा प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. शनिवारी आढळून आलेल्या मृत मोरा संदर्भात तालुका पशुसंवर्धन विभागाला कळवले असल्याचेही येथील ग्रामस्थांनी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close