देश विदेश

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शरद पवार मैदानात

मुंबई — केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आंदोलनाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत होणाऱ्या तीन दिवसीय आंदोलनात शरद पवार सहभागी होणार आहेत, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घ्या, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या ५६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर २३,२४ आणि २५ जानेवारी असे तीन दिवस शेतकरी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात शरद पवार हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष, त्यांचे नेते आणि स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत, असे नवाब मलिक म्हणाले.

मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या मूळावर येणारे असून या कायद्यांमुळे शेती आणि शेतकरी कॉर्पोरेटच्या घशात जाणार आहेत, त्यामुळे हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ५६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या तिन्ही कायद्यांना स्थगिती दिली आहे. या कायद्यांवरील शेतकरी नेते आणि मोदी सरकारमधील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरत आहेत. तर दुसरीकडे या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत चालला आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर तीन दिवस आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. शरद पवार यांनी प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्वही पवार यांनी केले होते.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे ऐकले पाहिजे. कठोर भूमिका सोडून शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे आणि चर्चेतून हा तिढा सोडवला पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडलेली आहे. आता शरद पवार शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात थेट सहभागी होणार असल्यामुळे या आंदोलनाची धार आणखी वाढणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close