देश विदेश

रामाच्या वानरसेनेने राम सेतू बांधला का? संशोधनातून उजागर होणार सत्य

नवी दिल्ली –. अरबी समुद्रा मध्ये भारत श्रीलंका दरम्यान असलेला रामसेतू कसा आणि कधी बनवण्यात आला याचा शोध भारतीय पुरातत्व खात्याकडून (ASI) सुरू करण्यात येणार आहे. या संशोधनांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विशेष प्रकल्पामुळे रामायणा संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी याचा फायदा होणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
भारतीय पुरातत्व विभागाच्या केंद्रीय सल्लागार समितीने सीएसआयआर- नॅशनल इन्स्टियूट ऑफ ओशनोग्राफीच्या (NIO) संशोधनासंदर्भातील अर्जाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे आता या इन्स्टियूटमधील वैज्ञानिकांचा राम सेतूसंदर्भातील संशोधन सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या प्रकल्पाशी संबंधित संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार संशोधनामधून यापूर्वी कधीही समोर न आलेली बरीच माहिती नव्याने कळेल. राम सेतूसोबतच रामायणासंदर्भातील महत्वपूर्ण माहिती या संशोधनामधून मिळण्याची अपेक्षा संशोधकांनी व्यक्त केली आहे. या संशोधनासाठी एनआयओकडून सिंधू संकल्प किंवा सिंधू साधना या जहाजांचा वापर केला जाण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या दोन्ही जहाजांचे वैशिष्ट्य म्हणजे ही दोन्ही जहाजे पाण्याच्या पातळीखाली ३५ ते ४० मीटरपर्यंतचे नमूने गोळा करु शकतात. या जहाजांच्या मदतीने अगदी समुद्राच्या तळापर्यंत या सेतूसंदर्भातील काही पुरावे किंवा इतर सामुग्री सापडतेय का यासंदर्भात संशोधन केलं जाणार आहे. या संशोधनामधून राम सेतूच्या आजूबाजूला लोकवस्ती होती की नाही यासंदर्भातील माहिती हाती लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राम सेतूसंदर्भातील या संशोधनामध्ये रेडियोमॅट्रिक आणि थर्मोल्यूमिनिसेन्स (टीएल) सारख्या डेटिंग म्हणजेच कालमापन करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. येथील पाण्यामध्ये असणाऱ्या शेवाळाचीही तपासणी केली जाणार आहे. या पाण्यामध्ये असणाऱ्या शेवाळ तसेच कोरल्समधील कॅल्शियम कार्बोनेटच्या प्रमाणावरुन राम सेतूच्या कालावधीचा अंदाज बांधण्यात मोठी मदत होणार आहे.राम सेतू प्रकल्पाच्या संशोधनाला धार्मिक महत्वाबरोबरच राजकीय महत्वही आहे. रामसेतू मानवनिर्मित होता की नैसर्गिक याचा शोध घेण्यासंदर्भात वारंवार वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्तींकडून मागणी केली जाते. भारतीय पुराणशास्त्रानुसार रामसेतू हा भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान असून तो रामाच्या वानरसेनेने श्रीलंकेत जाण्यासाठी बांधला होता. तोच हा पूल असल्याचे सांगण्यात येतं. हा पूल जवळवजळ ४८ किलोमीटर लांबीचा आहे. २००७ साली एएसआयने यासंदर्भातील कोणताही पुरावा सध्या उपलब्ध नसल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांनंतर एएसआयने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेलं हे प्रतिज्ञापत्र मागे घेतलं होतं.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close