क्राईम

वाळू तस्करांचे कंबरडे मोडण्याची जिल्हाधिकार्‍यांची घोषणा पुळचट ठरली, भरधाव टिप्परने शेतकऱ्यास चिरडले

बीड — तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या गाडीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर 20 नोव्हेंबरला वाळूतस्करांनी महसूल पथकावर हल्ला केला होता यावेळी गेवराई येथे जाऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तस्करांचे कंबरडे मोडण्याची वल्गना केली होती ती हवेत विरली परिणामी जिल्ह्यात वाळू तस्करी जोरात सुरू असून आज शेतामध्ये जात असलेल्या एका शेतकऱ्यास अज्ञात वाळूच्या टिप्परने चिरडल्या ची घटना गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे घडली. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत घटनास्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी साहेब, वाळू तस्करी च्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांची घर भरली जात असतीलही पण वाळू तस्करी मुळे रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे. रुग्णाला दवाखान्यात नेत असताना त्याला रस्त्यातच प्राण गमवावा लागत आहे. शेतकऱ्यांना चिरडून टिप्पर भरधाव धावत आहेत. नद्यांमध्ये वाळू राहिली नाही. पाण्याचा थेंब जमिनीत मुरायला तयार नाही. नदीच्या कडेला असलेल्या सुपीक जमिनी साठवलेल्या वाळूमुळे नापीक बनत आहेत. एवढं पाप घेऊन पैसा सुखाने तूमच्या कर्मचार्‍यांना झोप येऊ देणार आहे काय ? हा प्रश्न एकदा अंतरात्म्याला विचारा आता उद्विग्न जनता म्हणू लागली आहे.

सध्या जिल्ह्यात आंधळ दळतय कुत्र पीठ खातय या म्हणीप्रमाणे कारभार सुरू आहे. प्रशासनावर जिल्हाधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही परिणामी प्रशासकीय यंत्रणा कोणालाच जूमानायला तयार नाही. यातूनच अवैध वाळू तस्करीला सोनेरी दिवस आले आहेत. महसूल विभागातील एखाद्या अधिकार्‍यांने कारवाई करायची म्हटलं तर त्यांच्या गाडीवर असलेले ड्रायव्हरच वाळू तस्करांना मिळालेले आहेत. पोलीस यंत्रणा तर पूर्णतः हप्ते खोरीत रंगलेली असल्यामुळे वाळू तस्करांना धाक राहिला नाही. धाक नसलेल्या वाळूतस्करांनी तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या गाडीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 20 नोव्हेंबरला गेवराई तालुक्यामध्येच महसूल कर्मचारी वाळूतस्करांनी झोडपून काढले. यावेळी गेवराई येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी झालेला हल्ला आहे असं म्हणत वाळू माफियांचे कंबरडे मोडण्याची भाषा केली पण ती भाषा बालिशच ठरली बीड ला येताच जिल्हाधिकार्‍यांनी गप्प पडी ची गोळी घेतली अन पुन्हा एकदा वाळू तस्करांचा हैदोस जिल्ह्यात सुरू झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून जप्त केलेला वाळू साठा देखील वाळूतस्करांनी चोरून नेला. पण ज्ञानवंत असल्याच्या धुंदी तील जिल्हाधिकार्‍यांनी याकडे लक्ष दिले नाही. आंदोलने झाली फरक पडला नाही. आता हे वाळूतस्कर शेतकऱ्यांच्या जीवावर देखील उठल्या चे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
गंगावाडी येथील शेतकरी रुस्तुम मते (वय 60) हे सकाळी 6.30 च्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षस भुवन येथून अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या अज्ञात हायवाने त्यांना चिरडले. यामध्ये ते जागीच ठार झाले असून त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याने पूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाला आहे.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अवैधरित्या चालणारी वाळू उपसा तत्काळ बंद करा व दोषींवर कारवाई करा, यासाठी गावकर्‍यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलीस , महसूल यंत्रणेचे अधिकारी दाखल झालेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close