संपादकीय

…..आयुष्यात सुख नांदेल…!! ✍️ आर.जे.अनु ✍️

मागील घटनांना विस्मृतीत ढकलणारा आणि नव्या जाणिवांना सामोरा जाणारा असा हा नवा दिवस… म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस..! २०२० हे वर्ष संपून २०२१ च्यावर्षात आपण पदार्पण आजपासून करीत आहोत.. माणसाचं जगणं सतत कुतूहलाने भारून टाकणारा, नवीन दिशा देणारा, आपल्या रोजच्या जगण्यात अर्थ आहे याची स्पष्ट ग्वाही देणारा हा नवा दिवस..! नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे एक न्यारीच गंमत असते.. नवी स्वप्नं, नव्या आशा-आकांक्षा , नित्यनूतन आव्हानं आणि त्यापाठोपाठ येणारी नव्या नव्हाळीची स्थित्यंतरं म्हणजेच येऊ घातलेलं नवं वर्ष..! येत्या वर्षात काय करायचं याचे अनेक संकल्प आपण मनाशी बांधत असतो, ते तंतोतत फॉलो करण्याचा ध्यास घेतो.. नवाकोरा करकरीत शुभारंभ करून,मनात स्वप्न पहात, नवं काही तरी करण्याचा उत्साह आणि जोम उराशी बाळगत येणाऱ्या वर्षाला सुरुवात करतो.. पण खरं तर माणसांचा, प्राण्यांचा इतकंच नव्हे तर निसर्गाच्या दिनक्रमामध्येही नेमाने उगवणारा प्रत्येक दिवस हा एक नवा अनुभवचं असतो..

गेल्या काही महिन्यांपासून आपण सगळेच जण अवघड परिस्थितून जात आहोत.. २०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनाच्या काळातच गेल.. कोरोना सारख्या महाभयानक विषाणूने आख्खं जग हादरवून सोडलं आणि या काळात पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स, सफाई कामगार, पत्रकार वर्ग आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत होते. जमावबंदी, सामाजिक अंतर पाळा, मास्कचा वापर करा..असं सतत आपल्याला सांगितलं जात होतं, या सगळ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सगळ्या भारतीयांनी एकत्र येऊन जी एकजूट दाखवली ती खरंच कौतुकास्पद होती. मुळात आपण भारतीय लोक भावनिक, मानवतावादी व वैचारिक आहोत. मानवतावादी दृष्टीकोन ठेवून आपण आत्तापर्यंत कोरोनाच्या काळात संकटावर मात केली आणि यापुढे देखील करीत आहोतच. या सगळ्या लॉकडाऊनच्या काळात अनेक बदल झाले. देशाच्या आर्थिक मंदीवर याचा मोठा परिणाम झाला, त्याचबरोबर रोजगार,उद्योग धंदा, व्यवसाय करणाऱ्या लोकांना, परप्रांतीय कामगार आणि त्यांच्यासोबत असणार त्यांच कुटुंब यांना लॉकडाऊनचा खूप मोठा आर्थिक फटका बसला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान देखील झालं..आपला बळीराजा म्हणजेच शेतकरी वर्गाला देखील वित्तहानी भोगावी लागली आणि परिणामी आत्महत्येच्या अनेक घटना पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या.
इतकंच नाही तर ( Domestic violence) घरगुती हिंसेच्या अनेक घटना खेड्या-पाड्याबरोबरच शहरातून देखील समोर आल्या. या सगळ्या परिस्थितीतून जात असताना अनेक बदल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात झाले. कोरोना या भयानक विषाणूने अनेक जणांचे बळी घेतले असले तरी काही चांगले बदल देखील आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात झाले. मग अगदी स्वच्छतेची व्याख्या पुन्हा नव्याने आपल्याला कळाली, सध्याच्या परिस्थितीत

आजची आर्थिक बचत उद्याची शिदोरी हा मूलमंत्र आपल्याला कळला, आर्थिकतेबरोबरच हरवलेल्या नात्यांचे ऋणानुबंध पुन्हा नव्याने कसे जोडले याची जाणीव आपल्याला झाली.. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांचे महत्व पुन्हा एकदा पटले, लॉकडाऊनच्या काळात आपल्यातील सुप्त कलागुणांची नव्याने ओळख झाली, इतकंच नाही तर अशिक्षीत आजीला सुद्धा लॉकडाऊन ,क्वारनटाईन सारखे इंग्रजी शब्द हा “कोरोना” शिकवून गेला.

या सगळ्या काळात अनेक समस्यांना, अडचणींना आपण तोंड दिले.. अगदी डिजिटल ऑनलाईन पद्धतीने आपण शिक्षण घेतले, या नव्या शिक्षण पद्धतीत अनेक तांत्रिक अडचणी देखील आल्या, काही वाड्या-वस्त्यांच्या मुलांना या नव्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा लाभ मिळाला नाही..पण जरी ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरीदेखील ऑफलाईन शिक्षणाचे महत्व आपल्याला समजले आणि आपण या दोन्ही शिक्षण पद्धतीचा वापर आपण करायला लागलो..
या सगळ्यात टेलिव्हिजन माध्यम सुद्धा मागे नव्हतं.. आपल्या करमणुकीची अगदी पुरेपूर (लॉकडाऊन संपेपर्यंत) काळजी घेत त्यांनी सुद्धा अनेक जुने सिनेमे, मालिका आपल्यासाठी दाखवायला सुरुवात केली, म्हणजे अगदी ६० च्या दशकातला, दिलीप कुमार,मधुबाला, दुर्गाबाई खोटे यांचा मुघल ए आजम असो नाहीतर अरुण गोविल, दीपिका, सुनील लहरी यांची रामायण मालिका!! या निमित्ताने का होईना पण घरात सगळी मंडळी एकत्र येऊन या जुन्या मालिकांचा आणि सिनेमाचा आनंद घेत होती..
असो, करमणुकीचा आणि गंमतीचा भाग सोडला तर कोरोनाच्या काळात आपण अनेक गोष्टी जाणून, उमजून घेतल्या आणि आता अनलॉकच्या प्रक्रियेतून जात आहोत.. अनलॉकची प्रक्रिया जरी सुरु असली तरीदेखील धोका अजून पूर्णपणे टळला आहे, असं आपल्याला समजून चालणार नाहीये.. शासनाने दिलेल्या नियमांना तंतोतंत पाळून, नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपण या परिस्थितीतून पुढे जाउयात, कारण असं म्हणतात ‘निसर्ग’ माणसाला शहाणा बनवत असतो.. सावध करत असतो.. काहीच न बोलता तो कितीतरी भाव प्रकट करत असतो.

सरत्या वर्षाला निरोप देत कवी मंगेश पाडगावकर यांच्या ‘सरणारे वर्ष’ या कवितेतील काही ओळी प्रकर्षाने आठवतात….

निघताना ” पुन्हा भेटु “

असे मी म्हणनार नाही

” वचन ” हे कसे देऊ

जे मी पाळणार नाही

मी कोण ? सांगतो

” शुभ आशीष ” देऊ द्या

” सरणारे वर्ष ” मी

आता मला जाउ द्या…!

२०२० हे वर्ष तर संपलं, पण येऊ घातलेल्या या नवीन वर्षात पुन्हा एकदा नव्या जोमाने आनंदी जगण्याचा ध्यास घेऊयात..आपल्या आयुष्यातील निराशा, निष्क्रियता, निरसता, अपयश नक्कीच गळून पडेल, आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या आयुष्यात सुख नांदेल..!

नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा..!

      ✍️    अनुजा मुळे/ आर.जे.अनु✍️

                   ■ अहमदनगर  ■

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close