आपला जिल्हा

ग्रामसेवकांनो, मंजूर घरकुलाच्या याद्या ग्राम पंचायत मध्ये लावा – अँड. अजित देशमुख

बीड —  ग्राम पातळीवरील गरजू लोकांना घरकुल देण्यात येते. बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील गावात शासनाने गरजूंना घरकुले मंजूर केली आहेत. हजारावर घरकुले मंजूर झालेली असताना ग्रामसेवकांनी अजूनही याद्या ग्रामपंचायत मध्ये लावलेल्या नाहीत. भ्रष्ट कारभाराला पेव फुटले असून गुप्त ठेवलेल्या घरकुलांच्या याद्या मुळे आर्थिक घोटाळे वाढत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांनी आपल्या गावांमध्ये मंजूर झालेल्या घरकुलांच्या याद्या तात्काळ प्रकाशित कराव्यात आणि जनतेसाठी खुल्या कराव्यात, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झालेली असताना ग्रामसेवक आणि पंचायत समिती प्रशासन याद्या नोटीस बोर्डावर प्रकाशित करत नाहीत. याद्या लाभार्थींना आणि गावातील जनतेला समजल्या तर घरकुल मंजूर करून देतो, या सबबीखाली कोणीही कोणाकडून पैसे घेऊ शकणार नाही.

अनेक ठिकाणी यादी माहीत नसल्यामुळे आणि यादीत नाव आल्याचे माहीत नसल्याने अनेक जन घरकुल मंजूर करून देतो, या सबबी खाली बनवाबनवी करत असल्याच्या तक्रारी जनआंदोलनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जन आंदोलनाने या संदर्भातील माहिती प्रशासनाकडे मागितली आहे.

निवडणुकीचे वातावरण असल्याने आणि मंजूर घरकुलाच्या याद्या जाहीर न झाल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत देखील या प्रकाराचा गैरफायदा घेऊन घेतला जाऊ शकतो. हे रोखणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणाकोणाला घरकुले मंजूर झालेली आहेत, याच्या याद्या निवडणुकीपूर्वी प्रशासनाने तात्काळ जाहीर कराव्यात. लोकांमध्ये संभ्रम ठेवू नये.

ग्रामसेवकांनी ही माहिती जनतेसाठी खुली करून ठेवावी. ज्यांना घरकुल मंजूर झालेले आहे. त्यांनी कोणालाही लाच देऊ नये. आपापल्या घरकुलाचे काम प्रत्यक्षात पूर्ण करावे. घरकुलाच्या कामांमध्ये बोगसगिरी करू नये आणि काम न करता घरकुलाचे अनुदान उचलू नये, असे आवाहन देखील देशमुख यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close