आपला जिल्हा

शासकीय योजनेच्या लाभाचे पैसे न मिळाल्याने राक्षसभुवन येथे शेतकऱ्याची आत्महत्या

बीड- पोखरा योजनेंतर्गत घेतलेल्या शेततळ्याच्या अस्तरीकरणाचे अनुदान मागील आठ महिने झाले मिळाले नाही. यातच शेततळ्यासाठी हात उसने घेतलेले पैसे परत द्यायचे कसे? या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे घडली .

बाळासाहेब ज्ञानोबा मस्के (वय-42) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, ‘मायबाप सरकार मी आत्महत्या करीत आहे. शासकीय योजनेतील पैसे मिळाले नसल्याने कर्जबाजारी झालो आहे. तर प्रिय बंधू नाना व आप्पा माझी दोन मुलं आहेत. त्यांना तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळा, मी जात आहे मला माफ करा.’ गोड्या पाण्यातील मत्स्य पालन केले त्याचे देखील अनुदान मिळाले नाही. यासाठी कर्ज काढलं. मात्र, सरकारी निधी मिळाला नाही. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहे, असं या शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिलं आहे.
या घटनेने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासकीय योजनांचा लाभ फक्त धनदांडग्यांना मिळतो का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या योजनेचे पैसे वेळेत न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. त्याचबरोबर या घटनेमुळे शासकीय योजनांचा गाजावाजा करून त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळतो का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close