महाराष्ट्र

ना भाजपा ओबीसीचा,ना ओबीसी भाजपाचा कल्याण आखाडे यांचा भाजपाच्या त्या स्लोगनवर निशाणा

बीड — प्रमूख आधार असलेला ओबीसी समाज भाजपापासून दुरावू लागल्यामुळे भाजपकडून ओबीसींना कुरवाळण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. मात्र, आता ना भाजपा ओबीसीचा राहिला, ना ओबीसी भाजपचा! अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करून भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश बैठकीप्रसंगीच्या बॅनरवरील भाजपा ओबीसीचा, ओबीसी भाजपाचा या स्लोगनवरुन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी निशाणा साधला आहे.

पत्रकात त्यांनी असे म्हटले आहे की, ओबीसी दुरावल्यामुळेच मागील विधानसभा निवडणुकीत बऱ्याच मतदारसंघात फटका सहन करावा लागला, सत्ता गेली याचे भाजपाला आता भान आल्याचे स्लोगनवरुन स्पष्ट होत आहे. “बुंद से गई, ओ हौदसे नही आती” या कहावतीनुसार आता भाजपाच्या ओबीसी कुरवाळण्याच्या या स्टॅटर्जीचा फरक पडेल असे मुळीच वाटत नाही. कारण ज्या ओबीसींच्या मतांच्या जिवावर सत्ता आली होती त्यांना सत्तेच्या काळात वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार भाजपकडून झाला आहे. थोडक्यात, मतासाठी ओबीसी मात्र सत्ता ओबीसींना नाही ही भाजपाची राजनीती समजावी लागेल. भाजपमधील ओबीसी नेते मंडळी देखील सत्तेच्या तोऱ्यात राहीली. त्यांना ओबीसी प्रश्नाचे काहीच सोयरसुतक नव्हते हे वेळोवेळी ओबीसी समाजाने अनुभवलेले आहे. ओबीसीचे प्रश्न सोडविण्याऐवजी प्रश्न वाढविण्याचे भाजपाचे धोरण ठरले.
विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश बैठकीतील भाषणात ओबीसी प्रवर्गासाठी भरभरून दिल्याचे मोठ्या दिमाखाने सांगितले. मात्र हे धादांत खोटे आहे. बाकी तर सोडा ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरपुर निधी उपलब्ध करून दिल्याच्या बढाया तुम्ही मारता परंतु प्रत्यक्षात मात्र भाजपा सत्ता काळात कर्जप्रकरणेच ठप्प म्हणजे अगदी बंदच होती. कुणालाच खडकूचाही लाभ मिळाला नाही. पाच सालात लाभार्थी शोधुनही सापडनार नाही. ओबीसी महामंडळ म्हणजे केवळ शोभेची वस्तु उरले होते ही वस्तुस्थिती आहे. उलट आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल करून बढती देताना तुम्ही ओबीसी महामंडळ व वसंतराव नाईक भटके विमुक्त आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पद रद्द करत उपाध्यक्ष पद निर्माण करून अवनती करताना ओबीसी व भटके-विमुक्त समाजाचा अवमान केलेला आहे.
भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असून भाजपाच्या वरलीया रंगाला ओबीसी जनता आता कदापी भुलणार नाही असे कल्याण आखाडे यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close