महाराष्ट्र

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

मुंबई — राज्याचे माजी आदिवासी मंत्री व भाजप नेते विष्णू सावरा यांचे आज मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. विष्णू सावरा हे गेल्या दोन वर्षांपासून यकृताच्या विकाराने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना उपचारासाठी कोकिळाबेन रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे. विष्णू सावरा यांच्यावर वाडा येथे उद्या (गुरुवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विष्णू सावरा यांचे आदिवासी विकासात मोठे योगदान राहिले आहे. पालघर जिल्ह्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. ते तब्बल सहा वेळा विधानसभेवर निवडून आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आदिवासी विकास मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्याआधी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्येही शेवटचे सहा महिने सावरा आदिवासी विकास मंत्री राहिले होते. विष्णू सावरा यांचा जन्म 1 जून 1950 चा. वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सहभाग घेतला. 1980 मध्ये बँकेची नोकरी सोडून ते सक्रिय राजकारणात आले. 1980 आणि 1985 मध्ये वाडा मतदारसंघातून ते लढले पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मात्र विजयाचा धडाका लावला. विधानसभेत सुरुवातीला त्यांनी भाजपकडून वाडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मतदारसंघांच्या पुनर्ररचनेत विक्रमगड मतदारसंघ अस्तित्वात आला आणि तिथून 2014 मध्ये त्यांनी विजय मिळवला होता.

सावरा यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक: राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. विष्णू सावरा यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मितभाषी, संवेदनशील व कर्तव्यदक्ष व्यक्तित्व असलेले सावरा जनसेवेसाठी सदैव तत्पर असत. उत्तम संघटक असलेले सावरा विधानमंडळाचे अनुभवी सदस्य होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले होते. त्यांच्या निधनामुळे आदिवासींच्या विकासासाठी आत्यंतिक तळमळ असणाऱ्या जीवनाचा अस्त झाला आहे. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close